म्हापसा अग्निशामक दलाची साडेतीन तास आगीशी झुंज : लाकडी सामान, वीज उपकरणे जळून खाक
प्रतिनिधी /म्हापसा
ग्रेंड पिकेन हणजूण येथे असलेल्या ब्लू लाईन हॉस्पिलीटी रेस्टॉरंटला पहाटे आकस्मिक लागलेल्या भिषण आगीत लाकडी रेस्टॉरंट पूर्णतः जळून खाक झाले. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. याबाबत पोलीस चौकशी सुरु आहे. या आगीत रेस्टॉरंटचे लाकडी सामान, वीज उपकरणे, फर्निचर आदी मिळून सुमारे 10 लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझविण्यात यश मिळविले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग 12.30 वा.च्या दरम्यान लागली. रात्री 12.30वा.च्या सुमारास जेवणासाठी तेथील कर्मचारी बसले असता त्यांना रेस्टॉरंटमधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित नळाच्या पाण्याचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रुद्र रुप धारण केल्यावर त्या कर्मचाऱयांनी आरडाओरड करुन इतरांना बोलावून घेतले. घटनेची माहिती मालकाला दिली व अग्निशामक दलास कळविण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत साडेतीन तास आगीशी झुंज देत ही आग विझविण्यात यश मिळविले. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव यांच्या नेतृत्वाखाली अशोक परब, फायरमेन परेश मांद्रेकर, सुरज कारापूरकर, नितीन मयेकर, अक्षय सावंत, स्वप्नेश कळंगुटकर, अर्जुन धावस्कर, प्रवीण पिसुर्लेकर यांनी आग आटोक्यात आणली. आगीत रेस्टॉरंटमधील सर्व सामान जळून खाक झाले.