पैंगीणच्या ग्रामसभेत एकमताने ठराव संमत : विद्यमान प्रकल्पासाठी आलेला खर्च देण्याची मागणी, पैंगीण कोमुनिदाद नवीन जागा द्यायला तयार
प्रतिनिधी /काणकोण
पैंगीण पंचायतीने भरवळा, हत्तीपावल या ठिकाणी उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प इतरत्र स्थलांतर करायचा झाल्यास आतापर्यंत या प्रकल्पासाठी जेवढा खर्च आलेला आहे तो देतानाच जागेसहित नवीन प्रकल्प उभारून देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव पैंगीणच्या ग्रामसभेत घेण्यात आला. पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला पंच फिलीप मोन्तेरो वगळता सर्व सदस्य उपस्थित होते.
2007 साली तत्कालीन उपसरपंच सतीश पैंगीणकर आणि पंच विपीन प्रभुगावकर यांच्या कारकिर्दीत पर्तगाळी मठाच्या मालकीची 5 हजार चौ. मी. इतकी जमीन कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि कोंडवाडय़ासाठी आरक्षित करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जवळजवळ 12 वर्षांनी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने केलेल्या अर्थसाहाय्याच्या आधारे या जमिनीच्या सभोवती दगडी कुंपण तसेच सुका कचरा साठविण्यासाठी व्यवस्था आणि कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली इमारत बांधून तयार झाली आहे. त्यासाठी 24 लाख रु. इतका खर्च आलेला आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने या प्रकल्पासाठी लागणारा इन्सुलेटर, शिडी व अन्य सामग्री नुकतीच दिलेली असून या ठिकाणी केवळ सुक्या कचऱयावरच प्रक्रिया करण्यात येणार होती, अशी माहिती पंच विपीन प्रभुगावकर यांनी ग्रामसभेसमोर सादर केली.
मठाचा प्रकल्पाला विरोध
ज्या भागात सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला आहे ती जागा पवित्र अशी असून सदर प्रकल्पाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुरातन मठ वास्तूत पर्तगाळी मठाधीश विश्रांतीसाठी येत असत. शिवाय या ठिकाणी एक प्राचीन तळी आहे. या वास्तूचा वापर होत नसल्यामुळे त्याला पडक्या भिंतींचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. महानिर्वाण झालेले तत्कालीन स्वामी महाराज श्रीमद् विद्याधिराजतीर्थ यांनी जरी प्रकल्प उभारायला ना हरकत दाखला दिलेला होता, तरी विद्यमान स्वामी महाराज श्रीमद् विद्याधीशतीर्थ यांनी त्याला हरकत घेतली आहे आणि सदर प्रकल्प इतरत्र हलविण्याचा आदेश दिला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जेवढा खर्च आलेला आहे तो सर्व खर्च देण्याची तयारी स्वामी महाराजांनी ठेवली आहे, अशी माहिती यावेळी पैंगीण परशुराम देवस्थान समितीचे अध्यक्ष दामोदर फळगावकर यांनी दिली.
पैंगीण कोमुनिदाद नवीन जागा देणार
स्वामी महाराजांच्या आदेशानुसार हत्तीपावल येथील कचरा प्रकल्प इतरत्र हलवायचा झाल्यास गिमणे, पैंगीण येथील सध्याच्या स्मशानभूमीजवळची कोमुनिदादीच्या मालकीची 6000 चौ. मी. इतकी जमीन देण्याची तयारी कोमुनिदादीने ठेवली आहे. गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षानिमित्त गोवा सरकारने पैंगीण पंचायतीला 50 लाख रुपयांचे अनुदान दिलेले असून या अनुदानातून एक ग्रामीण आरोग्य केंद्र आणि एक वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त 9000 चौ. मी. इतकी भरवळा येथील जमीन पंचायतीला देण्याची तयारी कोमुनिदादीने ठेवली आहे. पैंगीण कोमुनिदादीचे अध्यक्ष योगेश प्रभुगावकर यांनी तशी संमती दर्शविली आहे.
गिमणे येथे कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध
सध्याची गिमणे येथील स्मशानभूमी पैंगीण पंचायतीपुरती मर्यादित राहिलेली नसून तालुक्याच्या विविध भागांतील निधन झालेल्या नागरिकांच्या पार्थिवांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असतात. या स्मशानभूमीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर निवासी घरे आहेत. गोमंतक मराठा समाजाने आपल्या नियोजित वास्तुसाठी या ठिकाणी 2500 चौ. मी. इतकी जमीन विकत घेतलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्यास भविष्यकाळात या प्रकल्पाचा स्थानिकांना त्रास होऊ शकतो. पर्तगाळी मठाच्या स्वामी महाराजांचा आदेश पाळणे आमचे कर्तव्य आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा विषय अत्यंत संवेदनशील असा असून त्यासाठी अन्यत्र जागा निवडावी, पण गिमणे येथे नको, असे मत पैंगीणचे माजी उपसरपंच सतीश पैंगीणकर, पोटके येथील एक ग्रामस्थ जयेश नाईक यांनी मांडले.
हत्तीपावल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा विषय ग्रामसभेत चर्चेला येणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे प्रकल्पाला विरोध करणाऱयांनी ग्रामसभेला गर्दी केली होती. परंतु विधायक कामासाठी नेहमी संघटित राहणाऱया पैंगीणच्या नागरिकांनी हा संवेदनशील विषय सहज सोडविला आणि नव्या प्रस्तावाला बहुमताने मान्यता दिली. यावेळी झालेल्या चर्चेत अजित पैंगीणकर, दामोदर शेणवी, सुभाष महाले, मधुकर शेणवी, सतीश पैंगीणकर, प्रवीण भट, सेबी फर्नांडिस, प्रदीप मोखर्डकर, विराज पै खोत, पंच सरिता पागी, रूद्रेश नमशीकर, रामदास पुजारी, प्रवीर भंडारी, दीक्षा पागी यांनी भाग घेतला.
विद्यमान मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव
पोटके, पैंगीण येथील 40 वर्षांपासून खितपत पडलेल्या मैदानाचा प्रश्न धसास लावण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले पंच प्रवीर भंडारी तसेच संपूर्ण पंचायत मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. महालवाडा येथील कोल्याबांध येथे संरक्षक भिंत उभारण्यासंबंधी या वाडय़ावरील 21 शेतकऱयांनी पंचायतीला एक निवेदन दिलेले असून त्या प्रस्तावाला मान्यता देतानाच पंचायतीच्या नवीन जैवविविधता व्यवस्थापन समितीची निवड या बैठकीत करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पैंगीण पंचायतीची सुभाष महाले यांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता व्यवस्थापन समिती निवडण्यात आली असून या समितीवर कल्पना भट, लुईझा पेरेरा (महिला सदस्य), आनंद वेळीप (आदिवासी सदस्य), विराज पै खोत, गजानन बांदेकर (सदस्य) आणि राजीव ना. गावकर यांचा सचिव म्हणून समावेश आहे. मागच्या ग्रामसभेचे इतिवृत्त पंचायत सचिव राजीव ना. गावकर यांनी सादर केले आणि ग्रगामसभेकडून मान्यता घेतली. सध्याच्या प्रकल्पासंबंधीची सविस्तर माहिती पंचायत संचालनालयाला पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील सोपस्कार केले जातील, असे पंचायत सचिव गावकर यांनी स्पष्ट केले.