पुलाची शिरोली / प्रतिनिधी
अज्ञात चार जणांच्या टोळीने हत्यारांचा धाक दाखवून व मारहाण करून पेट्रोल पंपातील पावणेतीन लाख रुपयांची लूट केली. हि घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली औद्योगिक वसाहतीतील जाजल पेट्रोल पंपात सोमवारी पहाटे चार वाजता घडली. याबाबत पंपातील कर्मचारी जगदीश व्यंकटराव कांबळे वय वर्षे २६, रा. खुपीरे ता. करवीर यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप गावाच्या हद्दीत जाजल पेट्रोल पंप आहे. या पंपातील कर्मचारी जगदीश कांबळे रा. खुपीरे, ता करवीर व कुमार वघ्रे रा. सोनवडे, ता. शाहूवाडी हे दोघेजण राञ पाळीत कामावर होते. दोघेजण राञपाळीत काम संपल्यावर ऑफिसमध्ये झोपले होते. सोमवारी पहाटे चार वाजता अंदाजे २३ ते २५ वयोगटातील अज्ञात चार जणांच्या टोळीने ऑफिसचा दरवाजा तोडून हातात सुरा, चाकू व कटावनी घेऊन प्रवेश केला. व त्यांना हत्यारांचा धाक दाखवत लाथा बुक्यांनी मारहाण केली. व ऑफिसमधील कपाट तोडून तसेच साहित्य विस्कटून टाकत अडीच लाख रुपयांची रोकड व वीस हजार रुपये किंमतीचे मोबाईल हॅन्डसेट असे एकूण पावणेतीन लाख रुपयांची लूट केली.
घटनास्थळी सोमवारी सकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी भेट दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे हे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.