वसाहत योजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी : भूमापन खात्याला सर्वेक्षणासाठी बुडाचे पत्र
प्रतिनिधी / बेळगाव
बुडाच्यावतीने कणबर्गी येथील पिकावू शेतजमिनीमध्ये वसाहत योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेला काही शेतकऱयांची सहमती तर काहींचा विरोध आहे. मात्र, ही योजना राबविण्यास प्रशासनाने मंजुरी दिली असून लवकरच योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. संपादित जमिनीची हद्द निश्चिती करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कणबर्गी येथील 165 एकर पिकावू जमिनीत वसाहत राबविण्याचा घाट बुडाने घातला आहे. योजनेकरिता 2007 मध्ये भू-संपादनाच्या नोटिसा शेतकऱयांना बजावल्या होत्या. पण योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता पुढील कार्यवाही झाली नव्हती. तब्बल 13 वर्षांनंतर योजनेकरिता भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून 110 एकर शेतजमिनीचा ताबा बुडाने घेतला आहे. 165 एकरपैकी 110 एकर जमीन मालकांनी योजनेकरिता जमीन देण्याची सहमती दर्शविली होती. उर्वरित शेतमालकांनी योजना राबविण्यास विरोध दर्शवून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे भू-संपादन करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अद्यापही काही जमीन बुडाला मिळाली नाही. शेतकऱयांची याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या जमिनीचा भाग वगळून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विकसित जमिनीपैकी 50 टक्के भूखंड बुडा आपल्याकडे राखीव ठेवणार आहे. उर्वरित 50 टक्के भूखंड जमीन मालकांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे. पण या योजनेला काही शेतकऱयांचा अद्यापही विरोध आहे.
पावसाळा संपल्यानंतर योजनेचे काम मार्गी लागण्याची शक्मयता
बुडाच्या ताब्यात असलेल्या जमिनीमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय बुडाने घेतला असून याबाबतचा सुधारित आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. सदर योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली असून योजना राबविण्यासाठी आवश्यक तयारी बुडाने चालविली आहे. योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनीची हद्द निश्चिती करणे आवश्यक आहे. त्याकरिता भूमापन खात्याकडून सर्वेक्षण करून हद्द निश्चिती करण्यात येणार आहे. याकरिता बुडाने भूमापन खात्याला पत्र पाठविले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हद्द निश्चितीनंतर कणबर्गी वसाहत योजनेचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती बुडाच्या अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर योजनेचे काम मार्गी लागण्याची शक्मयता आहे.