प्रतिनिधी/ सातारा
फेसबुक, व्हॉटसऍपद्वारे ओळख करुन महिलेच्या मदतीने लुटणाऱया महिलेसह तिघांच्या टोळीला जेरबंद करण्यात सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. काजल प्रदीप मुळेकर (वय 28, रा. चव्हाणवस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे), अजिंक्य रावसाहेब नाळे (वय 23), वैभव प्रकाश नाळे (वय 28, दोघेही रा. करावागज, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 6 डिसेंबर 2019 रोजी ठोसेघर, ता. सातारा तसेच इतर ठिकाणी फेसबुक, व्हॉटसऍपद्वारे ओळख निर्माण करुन एका व्यक्तीला भेटण्याच्या बहाण्याने बोलविले होते. तो आल्यानंतर सोने, चारचाकी, पैसे त्याच्याकडून काढून घेवून त्याला दमदाटी करुन मारहाण केली होती. तद्नंतर फोटो, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली होती.
अशा प्रकारे कृत्य करणाऱया टोळीचा पोलीस शोध घेत असताना अशाच लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. मात्र समाजात बदनामी निर्माण होईल या भीतीने अनेकांनी तक्रारी दाखल केल्या नव्हत्या. संबंधित टोळी अत्यंत क्रियाशील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या.
तालुका डीबीच्या पथकाने पुसेगाव, बारामती आणि पुणे जिह्यात विविध ठिकाणावरील बातमीदाराकडून माहिती घेवून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता या टोळीत एका महिलेचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. संबंधितांना ताब्यात घेवून त्यांची पोलीस रिमांड घेवून चौकशी केली असता अशाप्रकारे त्यांनी अनेकांची फसवणूक केली असल्याचे सांगितले. या टोळीकडून कोणाची लुटमार झाली असल्यास त्यांनी तात्काळ सातारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्यांची नावे प्रसिद्ध केली जाणार नाहीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करीत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, डीबी पथकातील पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्वनाथ आंबळे सहभागी झाले.