युटय़ुब चॅनेलच्या नावे पाच लाखाची मागणी : तीन महिलांचाही समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
हनीट्रपच्या माध्यमातून जमखंडी येथील एका रहिवाशाकडे पाच लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱया पाच जणांच्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. माळमारुती पोलिसांनी बुधवारी नेहरुनगर येथील एका लॉजमधून त्यांना अटक केली आहे. युटय़ुब चॅनेलच्या नावे हा प्रकार सुरू होता.
जमखंडी येथील एका रहिवाशाशी संपर्क साधून त्याला बेळगावात बोलाविण्यात आले आहे. खासगी हॉटेलमध्ये बोलावून नंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. ‘प्राईम न्यूज चॅनेल’ या युटय़ूब चॅनेलच्या नावे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू होता. या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडे युटय़ुब चॅनेलची ओळखपत्रे आढळून आली आहेत. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदाशिव चिप्पलकट्टी (रा. हुलगबाळी, ता. अथणी), रघुनाथ धुमाळे (रा. नेहरुनगर), मंजुळा जट्टण्णावर (रा. सौंदत्ती), संगीता कनकीकोप्प (रा. उगरगोळ, ता. सौंदत्ती), गौरी लमाणी (रा. सौंदत्ती) अशी त्यांची नावे आहेत. या सर्व पाच जणांवर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव शहर व जिल्हय़ात यापूर्वीही हनीट्रपच्या अनेक घटना घडल्या आहेत. खासकरून सरकारी अधिकारी, धनिक व काही मठाधीशांनाही हनीट्रप करणाऱया टोळीने यापूर्वी उकळल्याची उदाहरणे आहेत. बुधवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी यापूर्वी अनेकांना ब्लॅकमेल केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
हनीट्रपचे संभाषण
जमखंडी येथील सावजाबरोबर चर्चा करून त्याला बेळगावला बोलाविण्यात आले. यासंबंधीचे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड झाले असून पोलिसांनी ही ध्वनिफीत ताब्यात घेतली आहे. सावजाला लॉजमध्ये बोलावून त्याचे एकांतातील छायाचित्रे घेतली जातात. व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. त्यानंतर ते दाखवून त्याला ब्लॅकमेल केले जाते. युटय़ुब चॅनेलच्या नावे अनेकांना अशा धंद्यात उतरल्याचे सामोरे आले आहे. सौंदत्ती येथील गौरीने अनेकांना झटका दिल्याची माहिती उघडकीस आली असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.