बलात्कार तक्रारीची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी
प्रतिनिधी/ फलटण
येथील भाजी विक्रेत्याला पोलीस स्टेशनमध्ये मुलीवर बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱया सहा जणांविरूद्ध फलटण शहर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये एका मुलीचा समावेश आहे. संबंधित भाजी विक्रेत्यास ओढय़ात ओढत नेवून त्याच्याबरोबर गुन्हेगारांनी किळसवाणा प्रकार केला. हनी ट्रपद्वारे भाजी विक्रेत्यास खंडणी मागणाऱया या गुन्हेगारातील दोघे हिस्ट्रीशिटर आहेत. फलटण पोलीस गुन्हेगरांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आह.s येथील भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱया व या घटनेतील फिर्यादीस अजित घोलप (रा. नागेश्वरनगर चौधरवाडी) याने भेंडीचा व्यापारी आला आहे त्याच्याकडे आपणास जायचे आहे असा बहाणा करून भाजी विक्रेत्यास आपल्या स्कूटीवर बसविले आणि येथील लक्ष्मीनगर येथील मानस प्लाझा बिल्डींग येथे आणले. दरम्यान, या ठिकाणी एका मुलीसह राजु बोके, मनोज हिप्परकर, रोहित भंडलकर, असे चौघे बसले होते. या तिघांनी भाजी विक्रेत्यास मुलीच्या अंगावर ढकलुन दिले व मोबाईलमध्ये फोटो काढले. या प्रकारानंतर त्या भाजी विक्रेत्यास गिरवी रोडवरील निर्जन ठिकाणी असणाऱया ओढय़ात नेले. त्याठिकाणी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. भंडलकर यांनी त्याच्या तोंडात लघवी केली. त्यावेळी अन्य जणांनी भाजी विक्रेत्यास घट्ट धरून ठेवले होते. अजित घोलप आणि विजयगिरी गोसावी या दोघांनी भाजी विक्रेत्यास ओढय़ात आणले होते. हा सर्व किळसवाणा प्रकार झाल्यानंतर संबधित सर्व आरोपींनी भाजी विक्रेत्यास दमबाजी करीत 20 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली जाणार असल्याची धमकी दिली.
दरम्यान, भितीपोटी व इज्जत जाईल अशी भावना झाल्याने अखेर भाजी विक्रेत्याने 15.50 लाख रुपये देण्याचे कबुल केले. यानंतर त्या भाजी विक्रेत्याची सुटका करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात पिडीत भाजी विक्रेत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या कानावर ही घटना घातल्यानंतर व त्यांना पूर्ण संरक्षण देण्याच्या पोलिसांच्या ग्वाहीनंतर पिडीत भाजी विक्रेत्याने या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस अधिकारी भारत किंद्रे व अन्य कर्मचाऱयांनी या घटनेतील सहा आरोपी विरुध्द खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे.