भरदिवसा 13 लाखाचा ऐवज लंपास : होनगा येथे पिस्तूलच्या धाकाने सव्वालाखाची चोरी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. भरदिवसा घरफोडय़ांचे प्रकार घडू लागले आहेत. हनुमाननगर येथे एका बंद घराचा पाठिमागील दरवाजा फोडून 13 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे, तर होनगा येथे पिस्तूल व विळय़ाचा धाक दाखवून एका कारखानदाराच्या घरातून 1 लाख 30 हजार रुपये पळविण्यात आले आहेत.
रविवारी या दोन्ही घटना घडल्या आहेत. एपीएमसी व काकती पोलीस स्थानकात या घटनांची नोंद झाली आहे. चोरी व दरोडय़ाच्या घटनांनी एकच खळबळ माजली असून बेळगावात सर्वसामान्य माणसे किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांनी पोलीस यंत्रणेसमोर आव्हानच उभे केले आहे.
पहिली घटना रविवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 यावेळेत हनुमाननगर येथे घडली आहे. डॉ. विनायक कबटे यांच्या बंद घराचा पाठिमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी तिजोरीतील 250 ग्रॅम सोने, 1 लाख रुपये रोख रक्कम पळविली आहे. दोघा अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. चोरटय़ांनी सुमारे 13 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे.
रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे डॉ. विनायक हे आपल्या घराला कुलूप लावून शिरोडय़ाला जात होते. घरमालक पहिल्या मजल्यावर राहतात. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मास्क व हँडग्लोज घातलेल्या एका तरुणाला घरमालकांनी पाहिले. घरमालकांनी त्यांना पाहिल्यामुळे दोन पिशवीत भरून ठेवलेले चांदीचे दागिने तसेच सोडून चोरटय़ांनी पळ काढला आहे. मात्र पाव किलो सोन्याचे दागिने पळविण्यात आले आहेत.
एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी डॉ. विनायक यांनी हे दागिने घरी आणले होते. तेथून जवळच त्यांचे स्वतःचे घर आहे. घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे म्हणून ते भाडय़ाच्या घरात राहतात. घरमालकांनी हटकले असते किंवा आरडाओरड केली असती तर कदाचित गुन्हेगार जाळय़ात अडकले असते. रविवारी रात्री उशिरा एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिरोडय़ाला निघालेले डॉ. विनायक अर्ध्यावरूनच बेळगावला परतले. रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला.
होनगा येथे दरोडेखोरांची दहशत
दुसरी घटना रविवारी रात्री 10.20 वाजण्याच्या सुमारास होनगा (ता. बेळगाव) येथे घडली आहे. रात्री प्रवीण भीमासा निरंजन (वय 35) हे आपल्या घरी टी.व्ही.वर क्रिकेटचे सामने पाहत होते. त्यावेळी त्यांच्या घरात मास्क, मंकी कॅप, हॅण्डग्लोज घातलेले तीन दरोडेखोर शिरले. घरात शिरताच प्रवीण यांच्या कपाळावर पिस्तूल रोखण्यात आली. हा प्रकार पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. लगेच तिच्या गळय़ावर विळा ठेवण्यात आला. आरडाओरड करू नका, आरडाओरड केलात तर काहीही होऊ शकते, पैसे कोठे आहेत सांगा, असे दरोडेखोरांनी सांगितले. आम्हाला सहकार्य केलात तर तुमचा जीव वाचेल, असे दरोडेखोरांनी सांगितले. पैसे कोठे आहेत असे विचारणा केल्यामुळे प्रवीण यांनी त्यांना तिजोरीकडे नेले. तिजोरी उघडताच 1 लाख 30 हजार रुपये त्यांच्या हाती लागले. ती रक्कम घेऊन दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. जाण्यापूर्वी पिस्तूलच्या मुठीने प्रवीण यांच्या डोक्मयावर हल्ला करण्यात आला. त्यांनी लागलीच काकती पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक गुरुनाथ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मारहाणीत प्रवीण हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. प्रवीण हे होनगा येथे प्लास्टिकचा कारखाना चालवितात. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाजवळच त्यांचे घर आहे.
दरोडेखोरांची छबी सीसीटीव्हीत कैद
होनगा येथील प्रवीण निरंजन यांच्या घरात शिरताना दरोडेखोरांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून मंकी कॅप व मास्क घातल्यामुळे दरोडेखोरांची ओळख पटविणे कठीण होत आहे. रविवारी रात्री 10.20 ते 10.25 यावेळेत केवळ पाच मिनिटांत दरोडेखोरांनी हे कृत्य केले आहे.