भाजप नेत्याचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
भोपाळ
माजी खासदार तसेच भाजपचे वरिष्ठ नेते प्रभात झा यांनी हबीबगंज रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. या मागणीकरता त्यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. या स्थानकाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची सूचना त्यांच्या कडून करण्यात आली आहे. हबीबगंज नावाचा कुठलाच इतिहास नसल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
अटलबिहारी यांचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला असून तेथेच त्यांचे शिक्षण पार पडले आहे. ग्वाल्हेर तसेच विदिशातून ते खासदार म्हणून निवडून आले आणि नंतर पंतप्रधान झाले. अशा स्थितीत हबीबगंज स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे, असे झा म्हणाले.
वाजपेयींचे नाव दिल्यास या स्थानकाला जगभरात ओळख प्राप्त होईल. याचबरोबर झाशी रेल्वेस्थानकाचेही नाव बदलण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. तर मध्यप्रदेशातील भाजपच्या अन्य नेत्यांनी होशंगाबाद जिल्हय़ाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.