प्रतिनिधी /बेळगाव
काबाडकष्ट करणाऱया असंघटित राज्यातील हमाल कर्मचाऱयांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना अद्याप शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने हमाल कर्मचाऱयांना तातडीने पेन्शन, पीएफ, सामाजिक सुरक्षा आणि ई-श्रम कार्ड सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्नाटक राज्य हमाल कर्मचारी फेडरेशनमार्फत सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे करण्यात आली.
काबाडकष्ट करणाऱया, व्यापार आणि मालवाहतुकीत मोलाची भूमिका बजावणाऱया हमाल कर्मचाऱयांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ग्रामीण भागातील बाजार, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बंदरे, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी काम करावे लागते. याबरोबरच हमाल कर्मचाऱयांचे शेतीतील उत्पादनावर काम अवलंबून असल्याने एपीएमसी कायद्यासह कृषी कायदे राज्य सरकारने रद्द करावेत आणि हमाल कर्मचाऱयांना दिलासा द्यावा. राज्यात एपीएमसीचा नवा कायदा लागू केल्याने बहुतांशी बाजारपेठा ओस पडल्या आहेत. त्यामुळे तातडीने हा कायदा रद्द करावा, अशी मागणीदेखील हमाल कर्मचाऱयांनी आंदोलनाद्वारे केली. बाजारपेठ शेतीमालाने फुलण्यासाठी एपीएमसी कायद्याबरोबर इतर कायदे रद्द करावेत. त्यामुळे हमालाला कामे मिळण्यास पूरक होणार आहे, अशी मागणीही कर्नाटक राज्य हमाल कर्मचारी फेडरेशनने निवेदनाद्वारे केली.