कोरोना रुग्णांप्रकरणी मोठी हेळसांड
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या डारंग जिल्हय़ात शासकीय रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाऐवजी कोरोनाग्रस्त रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. ही गंभीर चूक नावांच्या साधर्म्यामुळे घडली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायदंडाधिकाऱयांच्या मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
आसाम सरकारने मंगलदोई जिल्हा रुग्णालयात दाखल 14 रुग्णांना डिस्चार्ज करण्याची अनुमती दिली होती. मंगलदोई जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बरे झालेल्या रुग्णांची यादी वाचून दाखविली. यादीत हामिद अलीचे नाव वाचण्यात आले असता हनीफ अलीने प्रतिसाद दिला तर, हामिद अली गप्पच बसून राहिला.
हामिद अलीवर 5 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अली हा स्थलांतरित कामगार आहे. तर हनीफ अली 3 जूनपासून रुग्णालयात दाखल आहे. आतापर्यंत त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला नाही.
प्रशासनाने बुधवारी 5 जणांना डिस्चार्ज दिला होता. यावेळी स्थानिक आमदार गुरुज्योति दास, जिल्हय़ाचे उपायुक्त दिलीप कुमार बोराह आणि पोलीस अधीक्षक अमृत भुयान हे देखील उपस्थित होते. दोन्ही रुग्णांच्या नावात बरेच साधर्म्य असल्याने गोंधळ झाला आहे. हामिदच्या जागी हनीफला डिस्चार्ज देण्यात आल्याचे एका डॉक्टरने सांगितले आहे. चूक उमगताच रुग्णालय प्रशासनाने हनीफला पुन्हा बोलाविले आहे.