वार्ताहर / खानापूर
गोलिहळ्ळी वनविभागाच्या व्याप्तीतील दास्तीकोप क्रॉसवर वनविभागाने धाड टाकून हरणाच्या अवयवांची तस्करी करणाऱया दोघांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून हरणाचे शीर आणि शिंगे जप्त करण्यात आली.
वनविभागाला हरणाच्या अवयवांची तस्करी होत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीवरून विविध पथके नेमून वनअधिकाऱयांनी दास्तीकोप येथे पाळत ठेवली. यावेळी दोघेजण दुचाकीवरून हरणाचे अवयव वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. नागेश गुंडापा इटगी आणि अभिषेक कोरवर दोघेही रा. देविनकोप ता. कलघटगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर बाबू जमादार रा. हारुगेरी ता. रायबाग आणि शंकर लक्ष्मण देसाई उर्फ पाटील रा. सांबरा-बेळगाव हे दोघेजण फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. बेळगाव आणि गोलिहळ्ळी वनविभाग अधिकाऱयांचा समावेश असलेल्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयितांवर 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कित्तूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. अधिकारी एम. व्ही. अमरनाथ, साहाय्यक वनसंरक्षण अधिकारी एम. बी. कुसनाळ, सी. जी. मिरजी, शिवानंद मगदूम, श्रीनाथ कडोलकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.