म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यातील हरपवडे ता.पन्हाळा येथील जंगला लगत असलेल्या गुरवाचा नाळवा शेतात डोंगर भूस्खलन झालेल्या मातीच्या गाळात अडकलेल्या मादी गव्याला वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत गाळातून बाहेर काढत जीवदान दिले असून मादीवर उपचार सुरू आहेत.
हरपवडे येथे यावर्षीच्या अतिवृष्टीत डोंगर खचून गुरवाचा नाळवा नावाचे शेत गाळाने गाढले आहे. याच शेतात शनिवारी पहाटे मादी गवा अन्नाच्या शोधात असताना फसल्याने गाळात अडकली असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. लागलीच ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली.
त्यामुळे बाजार भोगाव वन परीक्षेत्र पणुत्रे बीटचे वनपाल नाथा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली सदर गवा मादीस गाळातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे प्रयत्न करण्यात आला. मात्र गाळात जेसीबी चालू न शकल्याने अखेर ग्रामस्थांच्या मदतीने गवा मादीस दोरखंड लावून ओढून बाहेर काढण्यात यश आले आहे. गेल्या एक दिवसापासून वन विभागाचे डॉ.वाळवेकर व जिल्हा परिषदेचे डॉ.कांबळे मादीवर उपचार करत आहेत. वनपाल नाथा पाटील वनरक्षक देसाई, हरपवडेचे सरपंच दिनकर चौगले,वनरक्षक बाजीराव देसाई, वनमजूर रघुनाथ पाटील, निवृत्ती चौधरी, विश्वास शिंदे, राजन भंडारी,सर्जेराव काटकर व ग्रामस्थांनी मादीस गाळातून बाहेर काढण्यास शर्तीचे प्रयत्न केल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.