डावखुऱया फिरकीपटूचे 19 धावात 3 बळी, दुबळय़ा मानल्या जाणाऱया पंजाबचा आरसीबीविरुद्ध 34 धावांनी सनसनाटी विजय
अहमदाबाद / वृत्तसंस्था
विराट कोहली (35), ग्लेन मॅक्सवेल (0) व एबी डीव्हिलियर्स (3) असे दिग्गज फलंदाज पाहता पाहता गारद करत डावखुऱया हरप्रीत ब्रारने खऱया अर्थाने पंजाबी हिसका दाखवल्यानंतर पंजाब किंग्स संघाने येथील आयपीएल साखळी सामन्यात तगडय़ा आरसीबीचा 34 धावांनी अक्षरशः धुव्वा उडवला आणि या हंगामातील आणखी एका खळबळजनक विजयाची नोंद केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या 57 चेंडूतील नाबाद 91 धावांच्या खेळीमुळे 5 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकात 8 बाद 145 धावांवरच समाधान मानावे लागले.
180 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना रिले मेरेडिथ (1-29), मोहम्मद शमी (1-28) यांच्या तिखट माऱयासमोर आरसीबीला पॉवर प्लेच्या 6 षटकात केवळ 36 धावा करता आल्या. 24 वर्षीय ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज मेरेडिथने बहरातील देवदत्तचा (7) त्रिफळा उडवत आरसीबीला पहिला धक्का दिला आणि आरसीबी यातून शेवटपर्यंत सावरु शकली नाही. आयपीएलमध्ये नेहमीच कसून परीक्षा घेणाऱया शमीचा एक उसळता चेंडू विराटच्या उजव्या ढोपरावर आदळून गेला. रजत पाटीदार 30 चेंडूत 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र या सामन्यात हरप्रीत ब्रार नावाचे वादळ घोंघावले आणि आरसीबीच्या उरल्यासुरल्या अपेक्षांना खऱया अर्थाने सुरुंग लावून गेले.
या डावखुऱया युवा फिरकीपटूने कोहली व मॅक्सवेल यांना 11 व्या षटकात सलग 2 चेंडूंवर त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला व आरसीबीच्या गोटात एकच खळबळ उडाली. नंतर 13 व्या षटकात गोलंदाजीला परतत पहिल्याच चेंडूवर डीव्हिलियर्सलाही बाद करत त्याने आणखी एक धक्का दिला. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर या सामन्यातील जानच निघून गेली आणि त्यानंतर पंजाबचा विजय ही निव्वळ औपचारिकता बाकी होती.
राहुल, गेलची फटकेबाजी
कर्णधार केएल राहुलच्या 57 चेंडूतील नाबाद 91 धावांच्या तडफदार खेळीमुळे पंजाब किंग्स इलेव्हनने 20 षटकात 5 बाद 179 धावांची मजल मारली. केएल राहुल व ख्रिस गेल (24 चेंडूत जलद 46) यांनी 80 धावांची भरभक्कम भागीदारी साकारली. मात्र, पंजाबची मध्यफळी आणखी एकदा गडगडली. त्यानंतर केवळ सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या हरप्रीत ब्रारला (17 चेंडूत नाबाद 25) दुहेरी धावसंख्या गाठता आली.
राहुल व ब्रार यांनी 8 व्या गडय़ासाठी 61 धावांची अभेद्य भागीदारी साकारत धावसंख्येला उत्तर आकार दिला. ख्रिस गेल डावातील 11 व्या षटकात बाद झाल्यानंतर या सामन्यात आरसीबीचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. राहुलने 57 चेंडूतील खेळीत 7 चौकार व 5 उत्तुंग षटकार फटकावले तर ब्रारने तुफानी फलंदाजी करताना 17 चेंडूत जलद 25 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 2 षटकार व एका चौकाराचा समावेश राहिला. डावाच्या प्रारंभी डॅनिएल सॅम्स व मोहम्मद सिराज यांनी काटेकोर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना काही अंशी जखडून ठेवले होते. मयांक अगरवालच्या गैरहजेरीत संधी मिळालेल्या प्रभसिमरन सिंगला 7 धावांवर परतावे लागले.
राहुल पहिल्या टप्प्यापासून सकारात्मक पवित्र्यात होता. पण, गेलने विस्फोटक फलंदाजी सुरु केल्यानंतरच राहुलची फटकेबाजी सुरु झाली. ख्रिस गेलने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात काईल जेमिसनला ओळीने चार चौकार फटकावले, त्यावेळी खुद्द जेमिसन देखील त्यावर विश्वास ठेवू शकला नाही. गेलने नंतर आरसीबीचा प्रीमियर गोलंदाज यजुवेंद्र चहलचा देखील 2 षटकारांनी समाचार घेतला. पुढे जेमिसननेच गेलची खेळी संपुष्टात आणली. त्याने या विस्फोटक फलंदाजाला यष्टीमागे एबी डीव्हिलियर्सकडे झेल देणे भाग पाडले.
उंचापुऱया जेमिसनने निकोलस पूरनला (0) देखील तंबूचा रस्ता दाखवला. दीपक हुडा (5) व शाहरुख खान (0) स्कोअररला फारशी तोशीस न देता बाद झाले. एकामागोमाग एक सहकारी गमावत चाललेल्या राहुलने एकेरी धाव घेत अर्धशतक साजरे केले आणि त्यानंतर त्याच्या फटकेबाजीला खरा रंग आला. त्याने या मोसमातील पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 2 चौकार व 1 षटकार वसूल केला तर हरप्रीत ब्रारने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत डावाची सांगता केली. या उभयतांच्या फटकेबाजीमुळे पंजाबने शेवटच्या दोन षटकात 22 धावांची आतषबाजी केली होती.
धावफलक
पंजाब किंग्स ः केएल राहुल नाबाद 91 (57 चेंडूत 7 चौकार, 5 षटकार), प्रभसिमरन सिंग झे. कोहली, गो. जेमिसन 7 (7 चेंडूत 1 चौकार), ख्रिस गेल झे. डीव्हिलियर्स, गो. सॅम्स 46 (24 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), निकोलस पूरन झे. शाहबाज, गो. जेमिसन 0 (3 चेंडू), दीपक हुडा झे. पाटीदार, गो. शाहबाज अहमद 5 (9 चेंडू), शाहरुख खान त्रि. गो. चहल 0 (3 चेंडू), हरप्रीत ब्रार नाबाद 25 (17 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार). अवांतर 5. एकूण 20 षटकात 5 बाद 179.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-19 (प्रबसिमरन, 3.3), 2-99 (गेल, 10.4), 3-107 (पूरन, 11.3), 4-117 (दीपक हुडा, 13.6), 5-118 (शाहरुख, 14.4).
गोलंदाजी ः डॅनिएल सॅम्स 4-0-24-1, मोहम्मद सिराज 3-0-24-0, काईल जेमिसन 3-0-32-2, यजुवेंद्र चहल 4-0-34-1, हर्षल पटेल 4-0-53-0, शाहबाज अहमद 2-0-11-1.
आरसीबी ः विराट कोहली त्रि. गो. हरप्रीत ब्रार 35 (34 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), देवदत्त पडिक्कल त्रि. गो. मेरेडिथ 7 (6 चेंडूत 1 षटकार), रजत पाटीदार झे. पूरन, गो. जॉर्डन 31 (30 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. हरप्रीत ब्रार 0 (1 चेंडू), एबी डीव्हिलियर्स झे. राहुल, गो. हरप्रीत ब्रार 3 (9 चेंडू), शाहबाज अहमद झे. हरप्रीत, गो. रवी बिश्नोई 8 (11 चेंडूत 1 चौकार), डॅनिएल सॅम्स त्रि. गो. रवी बिश्नोई 3 (4 चेंडू), काईल जेमिसन नाबाद 16 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हर्षल पटेल झे. रवी बिश्नोई, गो. शमी 31 (13 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), सिराज नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 8 बाद 145.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-19 (पडिक्कल, 2.3), 2-62 (विराट, 10.1), 3-62 (मॅक्सवेल, 10.2), 4-69 (डीव्हिलियर्स, 12.1), 5-91 (पाटीदार, 14.4), 6-96 (शाहबाज, 15.4), 7-96 (सॅम्स, 15.5), 8-144 (हर्षल, 19.4).
गोलंदाजी ः रिले मेरेडिथ 3.2-0-29-1, मोहम्मद शमी 3.4-0-28-1, रवी बिश्नोई 4-0-17-2, हरप्रीत ब्रार 4-1-19-3, ख्रिस जॉर्डन 4-0-31-1, दीपक हुडा 1-0-13-0.
कोण आहे हा हरप्रीत ब्रार?
अवघ्या 25 वर्षांचा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार हा पंजाबमधील मोगा येथील रहिवासी. या मोसमात येथे तो आपला पहिलाच सामना खेळत होता. सप्टेंबर 2019 मध्ये त्याने बांगलादेश यू-23 संघाविरुद्ध लिस्ट ए पदार्पण नोंदवले असून 2019 च्या आयपीएल हंगामातही तो पंजाब किंग्स इलेव्हन संघाचाच सदस्य राहिला आहे.