नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगला कोरोनाची बाधा झाली असून आपण घरीच क्वारन्टाईन असल्याचे त्याने शुक्रवारी जाहीर केले. ‘सौम्य लक्षणासह कोरोनाची बाधा झाली असून मी सर्व प्रकारची काळजी घेत आहे. जे माझ्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी तातडीने चाचणी करवून घ्यावी’, असे ट्वीट हरभजनने यावेळी केले. गतवर्षी डिसेंबरमध्ये हरभजनने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. 41 वर्षीय भज्जीने 103 कसोटी, 236 वनडे व 28 टी-20 सामने खेळले. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात त्याच्या खात्यावर 294 बळी नोंद आहेत.
हरभजनने 2015 साली श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी तर त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची वनडे खेळली. 2016 आशिया चषक स्पर्धेत युएईविरुद्ध प्रतिनिधीत्व केले, तो त्याच्यासाठी टी-20 मधील शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला एकाही क्रिकेट प्रकारात भारतीय संघात निवडले गेले नाही.
हरभजनने 103 कसोटीत 32.46 च्या सरासरीने 417 बळी घेतले असून 2007 टी-20 वर्ल्डकप व 2011 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश राहिला. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय आहे. जालंधरचा जन्म असलेल्या या दिग्गज फिरकीपटूच्या खात्यावर 367 आंतरराष्ट्रीय सामन्यात 711 बळी व 3569 धावा नोंद आहेत.