आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्मयता आहे. या महिन्याअखेर राज्यसभेत आम आदमी पक्षाचा पाच जागा मिळणार असल्याने वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या चर्चेत हरभजन सिंग याचे नाव विशेष चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या उमेदवारीला अरविंद केजरीवाल यांनीही सकारात्मकता दर्शवल्याने लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत याची घोषणा होऊ शकते.
हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. तसेच त्याला स्पोर्ट्स विद्यापीठात महत्वाचे पद देण्याचा इरादाही आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भगवत मान यांनी क्रीडा क्षेत्राला चालना देणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या हरभजनचे नाव चर्चेत असले तरी अन्य संभाव्य उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकत पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला होता. आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
दंगलीत जीव गमावलेल्या अंकितच्या कुटुंबाला मदत
दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीत जीव गमावलेल्या आयबी कर्मचाऱयाच्या भावाला अरविंद केजरीवाल सरकारने सरकारी नोकरी दिली आहे. दिल्ली हिंसाचारात अंकित शर्माची हत्या झाली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गुरुवारी या कुटुंबाला सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटरवर छायाचित्र शेअर केले आहे. ‘माणसाची कमतरता कधीच भरून निघू शकत नाही. परंतु, ही सरकारी नोकरी आणि 1 कोटी रुपयांची मदत अंकितच्या कुटुंबाला बळ देईल. भविष्यातही त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू’, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.