एका नेपाळी संशयिताला अटक
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी हरमल येथे केलेल्या कारवाईत 3 लाख 72 हजार ऊपये किमंतीचा ड्रग्ज पकडला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला पोलीस कोठडीत ठेवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयिताचे नाव दत्ता बहादूर बिरको नाथ (57, नेपाळ) असे आहे. संशयित मूळ नेपाळचा असला तरी तो गेल्या काही वर्षांपासून गोव्यात राहत होता. एका शॅक्सवर तो स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. संशयित ड्रग्ज प्रकरणात गुंतलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयिताला रंगेहाथ करण्यासाठी पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते. सोमवारी रात्री संशयित चरसची विक्री करण्यासाठी खालचावाडा हरमल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक लक्षी आमोणकर आणि त्यांची टीमने सापळा रचून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 930 ग्रॅम चरस जप्त केला आहे. उपअधीक्षक सुरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयराम कुंकळीकर पुढील तपास करीत आहेत.