वार्ताहर /हरमल
येथील पंचायतीच्या प्रभाग 9 चे पंचसदस्य मनोहर लक्ष्मण केरकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गट विकास खात्याचे अभियंते कृष्णा गडेकर यांनी निर्वाचन अधिकारी तर पंचायत सचिव दशरथ परब यांनी सहाय्य केले. गेल्या आठवडय़ात सरपंच प्रतीक्षा नाईक यानी अलिखित करारानुसार आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.
या बैठकीस पंच इनासियो डिसौझा, दिव्या दिलीप वायंगणकर, बेर्नाड फर्नांडिस, मनीषा नाईक कोरकणकर, अनंत गडेकर, प्रतीक्षा नाईक व नियुक्त पंच सज्जन हरमलकर उपस्थित होते. मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी नूतन सरपंच मनोहर केरकर यांचे खास अभिनंदन केले.
हरमल पंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच मनोहर केरकर यांनी सांगितले. या पंचायत क्षेत्रात अनेकविध समस्या असून कित्येक फाईल्स मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने त्यास चालना देण्यासाठी आपले खास प्रयत्न असतील. आगामी वर्ष निवडणूक वर्ष असल्याने आमदार सोपटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित असल्याचे सरपंच केरकर यांनी सांगितले.