दोडामार्ग / वार्ताहर:
पिकुळे, खोक्रल ते दोडामार्ग दरम्यान दुचाकीने प्रवास करत असताना प्रदिप पत्की यांची पिशवी पडली होती. त्यातील पाकिट पिकुळे शेळपीवाडी येथील आनंद श्रीधर नाईक यांना कोळमवाडी रस्त्यालगत सापडले. त्यांनी ते लागलीच पत्की यांच्याकडे सुपूर्द केले. नाईक यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी प्रदिप पत्की कामानिमित्त खोक्रल या गावी गेले होते. ते दोडामार्ग येथील आपल्या घरी दुचाकीने परतत असताना त्यांच्याकडे असलेली पिशवी प्रवासादरम्यान पडली होती. तेव्हापासून ते पिशवीचा शोध घेत होते. पिशवीत पाकीट होते, त्यात आधार कार्ड, एटीएम, आरसी बुक, आणि रोख होती. आपले महत्त्वाची कागदपत्रे त्या पिशवीत असल्याचा संदेश त्यांनी अनेक व्हाट्सअप ग्रुप वर पाठवला होता. गुरुवारी आनंद नाईक, काशीराम नाईक हे आपल्या शेतात गेले होते. ते माघारी परतत असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला पाकीट पडलेले दिसले. घरी आल्यावर व्हाट्सअप ग्रुप वरील संदेश मधील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून तुमचे पाकीट मिळाले असल्याचे त्यांनी पत्की यांना सांगितले. पत्की यांनी नाईक यांच्या घरी येत ते पाकीट स्वीकारले. नाईक यांनी प्रामाणीकपणे पाकीट दिल्याबद्दल पत्की यांनी त्यांना रोख रक्कम द्यायची ठरवली, पण त्यांनी ती नाकारली. २५० रुपये हनुमान मंदिर येथे देवकार्यास म्हणून स्विकारले. नाईक यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.