एस. पी. उपाध्ये यांच्या निधनाबद्दल शोकसभा
प्रतिनिधी / बेळगाव
रसिक रंजनचे सचिव एस. पी. उपाध्ये यांच्या निधनाबद्दल सोमवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात शोकसभा पार पडली. प्रारंभी एस. पी. उपाध्ये यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कोणतीही उपाधी नसलेले उपाध्ये अनेक संस्थांचे अनभिषिक्त प्रमुख होते. यावेळी लोकमान्य रंगमंदिर, रसिक रंजन, बुलक यांच्याबरोबरच शालेय वर्गमित्रांनी त्यांच्या समवेत घालविलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच संगीत, चित्रकला, सिनेसृष्टी, साहित्याविषयी आवड असणारा हरहुन्नरी कलाकार हरपल्याचे विचार व्यक्त
केले.
यावेळी प्रा. अनिल चौधरी म्हणाले, सतत काहीतरी सृजनशील निर्माण करणारा मित्र होता. या जगण्यावर या मरणावर शतशः प्रेम करावे, याप्रमाणे उपाध्ये हे प्रत्येक क्षण आनंदाने जगत होते. सुरात, तालात, चित्रात रमणारे, जीवनाकडे आश्वासक दृष्टिने पाहणारा सच्चा मित्र गमविल्याचे दुःख व्यक्त
केले.
नितिन कपिलेश्वरकर म्हणाले, उपाध्ये यांना मित्रपरिवार जमविणे, साहित्य कृती, चित्रकला, संस्कृतीमध्ये रस होता. प्रत्येक माणसावर प्रेम करणारा, साहित्यिकांचा आदर करणारा व कार्यक्रमासाठी कोणतेही गाणे तत्पर देऊन त्या गाण्यांची विस्तृत माहिती देणारे उपाध्ये आमच्यातून निघून गेले ही गोष्ट सर्वांनाच चटका लावणारी
आहे.
याप्रसंगी जगदीश कुंटे, डी. जी. कुलकर्णी, निखिल नलगुंदकर, आरती आपटे, गोविंद फडके, मंगेश देऊळकर आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी उपाध्ये कुटुंबीयातील मेघना व मनीषा उपाध्ये यांनीही उपाध्ये यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी एस. पी. उपाध्ये यांनी निर्माण केलेले जुन्या हिंदी चित्रपटातील गाणे दाखविण्यात आले. याप्रसंगी रसिक, विविध संस्थांचे पदाधिकारी व उपाध्ये कुटुंबीय उपस्थित होते.