कुंभमेळय़ातील पहिले शाही स्नान संपन्न : साधू-आखाडय़ांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
हरिद्वार / वृत्तसंस्था
देवभूमी उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये पहिले शाही स्नान गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पार पडले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आखाडे स्नान करण्यासाठी साधूंनी गर्दी केली होती. कुंभमेळा प्रशासनाने सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सामान्यांना ‘हर की पौडी’वर स्नानाला बंदी घातल्यामुळे त्याठिकाणी साधूंनी स्नानाचा योगायोग साधला. पहाटेपासूनच ‘हर की पौंडी’वर ब्रह्मकुंडात साधूंची गर्दी दिसून येत होती. गुरुवारी शिवरात्रीच्या निमित्ताने आखाडय़ांवर आणि संतांवर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टीही करण्यात आली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती.
जुना आखाडा, आव्हान आखाडा, अग्नि आखाडा आणि किन्नर आखाडाचे साधू ‘हर की पौडी’ ब्रह्मकुंडावर स्नानासाठी उतरले होते. त्यानंतर निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा यांनीही स्नान केले. पाठोपाठ महानिर्वाणी आखाडा आणि अटल आखाडा 4.00 वाजता स्नानासाठी पोहचले. गुरुवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सामान्य जनतेला मात्र ‘हर की पौंडी’वर स्नान करता आले नाही. इतर घाटांवर मात्र सामान्य लोक स्नान करताना दिसून येत होते. पहाटेपासूनच शेकडो भाविक येथे स्नानासाठी दाखल झाले होते. हरिद्वारमध्ये शाहीस्नानाअगोदर जवळपास 22 लाखांहून अधिक भाविकांनी स्नान उरकलंय. त्यानंतर घाट आखाडय़ांसाठी रिकामे करण्यात आले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक संजय गुंजयाल यांनी दिली.
राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शुभेच्छाकुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी बुधवारी आपल्या कार्यालयात पहिली बैठक घेतली. त्यांनी अधिकाऱयांसह हरिद्वार कुंभ व्यवस्थापनाला आवश्यक ते दिशानिर्देशही दिले. महाशिवरात्री निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावरून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.