चंदीगढ / वृत्तसंस्था
हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते अंबाला कॅन्टोनमेंटच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हरियाणा मंत्रिमंडळातील महत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱया अनिल विज यांनी कोवॅक्सिन परीक्षणाच्या स्वयंसेवकाची जबाबदारी खांद्यावर घेत 15 दिवसांपूर्वी कोरोना लस घेतली होती. तरीदेखील ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विज यांनी कोरोनाची लागण झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘मला कोरोना व्हायरसची लागण झाली असून मी रुग्णालयात उपचार घेत आहे.’ असे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आणि कर्मचाऱयांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी असा सल्लादेखील त्यांनी दिला.