ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल त्यांची तब्येत बघडल्याने त्यांना मोहालीमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यपाल आर्य यांना फोर्टिस रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथे त्यांना स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आले आहे.
राज्यपाल आर्य यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे कळताच मुख्यमंत्री मनोहर लाल आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी त्यांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी आर्य यांना आराम करण्याचा सल्ला देखील दिला.
दरम्यान, हरियाणामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या 2,02,027 वर पोहोचली आहे. त्यातील 1,80,647 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 2,038 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 19,342 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.