शेतकरी आंदोलनात झाला होता सहभागी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हरियाणातील एका 49 वर्षीय शेतकऱयाने रविवारी टिकरी सीमेजवळ झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतदेह पाहिल्यानंतर काही शेतकऱयांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्याकडे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीतील मजकूर तपास यंत्रणांनी उघड केलेला नाही. हा शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता. आत्महत्या करणारा शेतकरी मूळचा हरियाणामधील हिसार जिल्हय़ातील असल्याचे बहादूरगढ शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख विजयकुमार यांनी सांगितले.
टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळापासून दोन किमी अंतरावर या आंदोलनाला पाठिंबा देणाऱया अन्य एका शेतकऱयाने गेल्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. तर हरियाणातील एका शेतकऱयाने या कायद्यांच्या विरोधात किटकनाशक प्यायले होते. त्याचा दिल्लीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात या आंदोलनाला पाठिंबा देत एका वकिलाने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी शीख धर्मगुरू संत रामसिंग यांनी आपण शेतकऱयांचे हाल पाहू शकत नसल्याचे सांगत आपले जीवन सभेदरम्यानच संपवले होते.