वृत्तसंस्था/ चंदिगड
मागील वर्षी कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यावर्षी यशस्वी आयोजन केल्यानंतर हरियाणा आता महिलांच्या दोन आयटीएफ टेनिस स्पर्धा आयोजित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही आठवडय़ातच 25,000 डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धा होणार आहेत.
या दोन्ही टेनिस स्पर्धा झाज्जर येथील जॉयगाव अकादमीच्या क्ले कोर्टवर खेळविल्या जाणार आहेत. यातील पहिली स्पर्धा 26 एप्रिलपासून आणि दुसरी स्पर्धा 3 मे पासून होणार आहे. ‘अखिल भारतीय टेनिस संघटनेने सुमारे 900 स्पर्धा आजवर भरविल्या आहेत. त्यापैकी 300 हून अधिक स्पर्धा हरियाणा टेनिस संघटनेने आयोजित केल्या आहेत. मार्चमध्ये गुरुग्राम येथील विशाल उप्पल टेनिस प्रोजेक्ट येथे महिलांची 5 लाख रुपये बक्षीस रकमेची स्पर्धा आयोजित केली,’ असे हरियाणा टेनिस संघटनेचे सचिव सुमन कपूर म्हणाले.
‘या स्पर्धेनंतर महिला व पुरुषांची 10 लाख रुपये बक्षिसाची राष्ट्रीय हार्ड कोर्ट चॅम्पियनशिप याच ठिकाणी आयोजित करण्यात आली. झाज्जरमध्ये होणाऱया 25000 डॉलर्स बक्षीस रकमेच्या दोन स्पर्धांमुळे देशातील महिला टेनिसला निश्चितच संजीवनी मिळणार आहे,’ असेही कपूर म्हणाले. या केंद्रावर असणाऱया सुविधांबद्दल बोलताना, या ठिकाणी 8 फ्लडलाईट्स क्ले कोर्ट्स असून हरियाणा टेनिस संघटनेने 2016 मध्ये कोरियाविरुद्ध झालेली डेव्हिस चषक लढतीचे आयोजन चंदिगडमध्ये केले होते, असे त्यांनी सांगितले.