ऑनलाईन टीम / चंदीगड :
कृषी कायद्याच्या निषेधार्थ हरियाणातील शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर झज्जर रोहतक राष्ट्रीय महामार्गावरील डीघल टोल शेतकऱ्यांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून मोकळा केला.
टोल मॅनेजर नितेश मलिक म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रशासनाच्या वतीने टोलमुक्तीचा कोणताही अहवाल नाही. टोलपासून 24 तासांत 18 ते 20 हजार वाहने जातात. त्याद्वारे टोल कंपनीला 12 ते 15 लाखांचा कर मिळतो. मात्र, शेतकऱ्यांनी टोल मोकळा केल्याने हे नुकसान टोल कंपनीला होईल.
डीघल टोलनंतर सोनिपतमधील एनएच 44 वरील मुरथल टोल शेतकऱ्यांनी मोकळा केला आहे. रात्री उशिरापर्यंत टोल सुरळीत सुरू होता, पण सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतकऱ्यांची एक तुकडी टोलवर पोहोचली आणि टोल मुक्त करण्यात आला. टोल फ्री झाल्यानंतर कोणत्याही वाहनाकडून पैसे आकारले गेले नाहीत.