चंदिगढ / वृत्तसंस्था
हरियाणातील कोरोनाचा झपाटय़ाने वाढता संसर्ग पाहता राज्य सरकारने 26 जानेवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 12 जानेवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र संसर्गाचा धोका लक्षात घेता सरकारने आता प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनी सोमवारी सांगितले. राज्यात कोरोनाची तिसरी लाट पाहता 3 जानेवारीपासून सर्व शाळा बंद आहेत. शाळांना दरवषी दहा दिवस हिवाळी सुट्टय़ा असल्याने राज्य सरकारने 3 ते 12 जानेवारीपर्यंतच्या सुट्टय़ा हिवाळी सुट्टय़ांमध्ये समायोजित केल्या आहेत.