ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत हरियाणा सरकारने राज्यात सुरू असलेले लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी 3 मे ते 24 मे दरम्यान कडक निर्बंध जारी केले होते.
हरियाणा सरकारने सांगितले की, राज्यातील कोरोना संसर्गाचा दर कमी होत आहे. पण राज्यात अजूनही महामारी अलर्ट – सुरक्षित हरियाणा अभियान सुरू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात अजून एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
हरियाणा सरकारने 3 मे रोजी जे निर्बंध जारी केले होते त्याच निर्बंधाचे पालन यापुढे देखील केले जाणार आहे. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल सोडून अन्य सर्व दुकाने दिवसभर सुरू ठेवली जाणार आहेत. तर व्यावसायिक परिसरातील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेतच सुरू असतील. या सोबतच 31 मे पर्यंत सर्व आंगणवाड्या, क्रेच, सरकारी – खाजगी कॉलेज, कोचिंग क्लासेस, आयटीआय, लायब्ररी, प्रशिक्षण संस्था बंद असणार आहेत.
कोविड रुग्णांसाठी ‘संजीवनी परियोजना’ सुरु
हरियाणामध्ये कोविड रुग्णांसाठी संजीवनी परियोजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून परियोजनेची सुरुवात केली. परियाजनेच्या अंतर्गत कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची देखभाल तात्काळ त्यांच्या घरीच केली जाणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांना आता उपचार घेण्यासाठी त्यांना बाहेर जावे लागणार नाही. या परियोजने अंतर्गत 90 % रुग्णांची देखभाल घरच्या घरी करता येईल, असे सरकारने म्हणणे असून या योजनेचा विस्तार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत केला जाणार आहे.
वेगाने वाढत आहेत ‘ब्लॅक फंगस’चे रुग्ण
प्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. कालच्या दिवशी ब्लॅक फंगसमुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला. तर हरियाणामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या 400 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 147 रुग्ण हे गुरग्रामजिल्ह्यात आहेत.