तेलुगू टायटन्सवर दोन गुणांनी मात, पाटणा पायरेट्सचा पुणेरी पलटनला धक्का
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मीतू व रोहित गुलिया यांच्या चमकदार प्रदर्शनामुळे हरियाणा स्टीलर्सने तेलुगू टायटन्सवर तसेच पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटनवर विजय मिळविले.
हरियाणा स्टीलर्सने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत तेलुगू टायटन्सचा 39-37 असा पराभव करीत या मोसमातील पहिला विजय नोंदवला. या विजयाने ते गुणतक्त्यात आठव्या स्थानावर पोहोचले आहेत तर टायटन्स 11 व्या स्थानावर आहे. स्टीलर्सच्या मीतू या स्टार रायडरने 12 रेडपॉईंट मिळविले तर रोहित गुलियाने 8 गुण मिळविले. त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात तीन वेळचे चॅम्पियन पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटनवर 38-26 अशी मोठय़ा फरकाने मात केली. विजयी संघाच्या सचिनने सुपर 10 (10 गुण) मिळविले तर बचावफळीतील सुनील (4 गुण), मोहम्मदरेझा चियानेह (3 गुण) व सजिन सी. (3 गुण) यांची त्याला सुरेख साथ मिळाली.
पुणेरी पलटनच्या युवा खेळाडूंनी आश्वासक प्रदर्शन केले असले तरी दर्जेदार रायडरची त्यांना उणीव भासत असल्याने त्यांना तीन सामन्यात दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले. पुणेच्या राहुल चौधरीवर सर्वांचे लक्ष लागले होते. त्याने सुरुवात केली असली तरी प्रशिक्षक अनुप कुमार यांनी त्याला बदलून युवा मोहित गोयतला बदली खेळाडू म्हणून उतरवले. अस्लम इनामदार, पंकज मोहिते व मोहित या तीन रायडर्सनी पाटणाच्या बचावफळीवर बरेच दडपण आणले होते तर दुसऱया बाजूने पाटणाच्या प्रशांत कुमार राय व सचिन यांनीही प्रभावी प्रदर्शन केले. मध्यंतराला सहा मिनिटे असताना पाटणावर ऑलआऊट होण्याची वेळ आली होती. पण बचावपटू सजिन सी. याने सुपर टॅकल करीत बाजू पलटवली. पाटणा संघ यावेळी थोडा सुदैवीही ठरला. मोनू गोयतने रेड टाकल्यानंतर लॉबीमध्ये प्रवेश केला. पण पुणेच्या तीन डिफेंडर्सनी त्याचा पाठलाग केल्याने ते बाद झाले. पूर्वार्धात 14-14 अशी बरोबरी झाली तर पलटनचे यावेळी दोन खेळाडू बाकी होते.
पलटनने पंकज मोहितेच्या जागेवर शुभम शेळकेला मैदानात उतरवले तरी पाटणाने संघर्ष सुरूच ठेवला होता. दहा मिनिटे असताना पाटणा 4 गुणांनी आघाडीवर होते आणि पुणेची रेड चुकल्याने ती आणखी वाढली. सचिनने नंतर दोन रेडपॉईंट मिळवित 13 व्या मिनिटाला पुणेला ऑलआऊट करीत 10 गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या मिनिटाला पाटणाच्या सुनील व विशाल भारद्वाज यांना पिवळे कार्ड मिळाले. पुणेला जास्त संधी न देता पाटणाने 8 गुणांची आघाडी राखत विजय साकारला.
हरियाणाकडून टायटन्स पराभूत
हरियाणासाठी रोहितने बोनस गुणासह सुरुवात केली. टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईनेही जोरदार सुरुवात करीत त्यांना प्रत्युत्तर दिले. टायटन्सने 5-5 अशी बरोबरी साधल्यानंतर रोहितला आऊट करण्यात त्यांनी यश मिळविले. मात्र सिद्धार्थ देसाई सुपर टॅकल व रेडमध्ये रवि कुमारच्या तावडीतून सुटका करून घेऊ शकला नाही. यामुळे हरियाणाला किचिंत आघाडी मिळाली. मीतूने ही आघाडी तीन गुणांची केली. टायटन्सच्या देसाई व राकेश गौडा यांनी बोनस गुण मिळवित हरियाणाची आघाडी कमी केली. नंतर हरियाणाने ऑलआऊट करीत 16-11 अशी आघाडी घेतली आणि मध्यंतराला ती 23-19 अशी केली.
उत्तरार्धात तेलुगू टायटन्सला दुसऱयांदा ऑलआऊटला सामोरे जावे लागले. मीतूने नंतर सुपर टेन साधत हरियाणाला 36-26 अशा आघाडीवर आणले. शेवटच्या पाच मिनिटात टायटन्सने जोर केला. पण हरियाणाची आघाडी त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने विजयाचे अंतर फारसे कमी करता आले नाही. शेवटच्या रेडमध्ये हरियाणाने गुण मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यांचा विजय 39-37 असा निश्चित झाला होता.
आजचे सामने
1) जयपूर पिंक पँथर्स वि. यू मुम्बा
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) हरियाणा स्टीलर्स वि. बेंगळूर बुल्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.