वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा 48-29 अशा 19 गुणांच्या फरकाने पराभव केला तर दुसऱया एका चुरशीच्या सामन्यात दबंग दिल्लीने बेंगळूर बुल्सला 36-36 असे बरोबरीत रोखले.
हरियाणा आणि विद्यमान विजेता बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्यात हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्सला पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणा संघाचा कर्णधार विकास कांडोलाने या स्पर्धेत सहाव्यांदा सुपर 10 गुण मिळविले. त्याचप्रमाणे या संघातील रायडर्स विनय आणि आशिश यांनी अनुक्रमे 8 व 6 गुण मिळविले. बचावफळीतील मोहित, जयदीप, रविकुमार यांनी प्रत्येकी तीन गुण घेतले.
हरियाणा संघाने टॅकल गुण घेत आपले खाते उघडले. नवव्या मिनिटाला बंगालच्या खेळाडूंनी दोन जलद टॅकल गुण मिळवित हरियाणावर 7-6 अशी आघाडी मिळविली. नवव्या मिनिटाला आशिशने दोन टॅकल गुण घेत हरियाणा संघाला 9-9 अशीबरोबरी साधून दिली. 11 व्या मिनिटाला विकास कांडोलाने आपल्या चढाईवर 4 गुण घेत हरियाणाला 13-11 अशी आघाडी मिळवून दिली. हरियाणा संघाने बंगाल वॉरियर्सचे सर्वगडी बाद करून आपली आघाडी 17-14 अशी वाढविली. मात्र त्यानंतर बंगालच्या खेळाडूंनी दर्जेदार खेळ करत मध्यंतरापर्यंत 19-19 अशी बरोबरी साधली होती.
उत्तरार्धातील पहिल्या पाच मिनिटामध्ये विनयने टॅकल गुण मिळविला. दरम्यान हरियाणाच्या खेळाडूंनी आणखी दोन बोनस गुण घेत आपली आघाडी 24-21 अशी मिळविली. 32 व्या मिनिटाला विकास कांडोलाने आपल्या चढाईवर आणखी 4 गुण मिळविल्यानंतर बंगाल वॉरियर्सचे दुसऱयांदा सर्वगडी बाद झाल्याने हरियाणा संघाने बंगालवर 10 गुणांची आघाडी माळविली होती. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना विकास कांडोलाने या चालू कबड्डी हंगामातील सहाव्यांदा सुपर 10 गुण मिळविले. शेवटच्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचे तिसऱयांदा सर्वगडी बाद करून 42-29 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यातील शेवटच्या काही सेकंदात विनयने अंतिम गुण मिळवित हरियाणा संघाला 46-29 अशा गुणफरकाने शानदार विजय मिळवून दिला.
बेंगळूर-दिल्ली लढत शेवटच्या मिनिटाला टाय
या स्पर्धेतील शुक्रवारचा बेंगळूर बुल्स आणि दबंग दिल्ली यांच्यातील शेवटपर्यंत रंगलेला चुरशीचा सामना 36-36 अशा समान गुणफरकाने बरोबरीत (टाय) राहिला. या सामन्यात सुरूवातीला बेंगळूर बुल्सच्या पवन सेरावतने सुपर 10 गुण नोंदवित आपल्या संघाला 10 गुणांची आघाडी मिळवून दिली होती. पण, त्यानंतर नवोदित रायडर नवीनकुमारने सुपर दहा गुणांसह एकूण 13 गुण मिळवित दबंग दिल्ली संघाला सावरले. संदीप नरवाल आणि जोगिंदर नरवाल यांनी प्रत्येकी 4 गुण मिळविले.
मध्यंतराला 7 मिनिटे बाकी असताना दिल्लीने बेंगळूर बुल्सचे पहिल्यांदा सर्व गडी बाद करून 5 गुणांची आघाडी मिळविली. त्यानंतर बेंगळूर संघातील बचावफळीत खेळणाऱया कबड्डीपटूंनी दिल्ली दबंगची आघाडी कमी केली. मध्यंतरावेळी दिल्ली दबंगने बेंगळूर बुल्सवर 18-14 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यांच्या उत्तरार्धात बेंगळूर संघाने दुसऱयाच मिनिटाला दिल्ली दबंगचे सर्वगडी बाद केले. पवन आणि भरत यांची कामगिरी दर्जेदार झाली. उत्तरार्धातील खेळाच्या नवव्या मिनिटाला बेंगळूर बुल्सने दिल्ली दबंगचे सर्वगडी बाद करून 8 गुणांची आघाडी मिळविली होती.
पवन सेरावतने आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले. नवीनकुमारने सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना दिल्ली संघाला एका गुणांची आघाडी मिळवून दिली. नवीनकुमारने सुपर 10 गुण नोंदविले पण पवन सेरावतने आपल्या चढाईमध्ये दोन गुण घेत अखेर हा सामना 36-36 असा राखला. 30 सेकंद बाकी असताना बेंगळूरचा संघ एका गुणाने आघाडीवर होता पण मनजीत चिलारने पवन सेरावतला बाद करत दिल्ली संघाला हा सामना बरोबरीत सोडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले.