वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग हंगामातील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात पाटणा पायरेटस्ने हरियाणा स्टीलर्सचा 30-27 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला. या पराभवामुळे हरियाणा स्टीलर्सचे प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान समाप्त झाले.
या चुरशीच्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघातील अष्टपैलू आशिष नरवाल आणि जयदीप यांची कामगिरी दर्जेदार झाली. पण पाटणा पायरेटस्च्या बचावफळीतील खेळाडूंनी सामन्यातील शेवटच्या मिनिटाला हरियाणाच्या विकास कांडोला आणि नरवाल यांना बाद केल्याने पाटणा पायरेटस् संघाला हा सामना जिंकता आला. पाटणा पायरेटस्ने या सामन्यात तिसऱयाच मिनिटाला हरियाणावर 3 गुणांची आघाडी मिळविली होती. दहाव्या मिनिटाला पाटणा पायरेटस्चे सर्व गडी बाद झाल्याने हरियाणा स्टीलर्सने 12-4 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरावेळी पाटणा पायरेटस्ने हरियाणावर 17-14 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघांच्या रायडर्सनी आक्रमक चढाया करत आपल्या संघाला बरोबरी राखण्याचा प्रयत्न केला. सुरिंदर नाडाने टॅकल गुण मिळवित हा सामना 27-27 असा बरोबरीत राखला होता. 40 सेकंद बाकी असताना पाटणा संघाने सुपर टॅकलवर दोन गुण मिळविल्याने हरियाणा स्टीलर्सला हा सामना तीन गुणांनी गमवावा लागला.