ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हरियाणा सरकारने लॉकडाऊनमध्ये आणखी एक आठवडा वाढ केली आहे. त्यामुळे आता राज्यात 28 जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहे. मात्र, यातील अनेक निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये लग्न समारंभ, अंतिम विधीसाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये सूट दिली असल्याची घोषणा केली आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नवीन आदेशानुसार आता सरकारी कार्यालये पूर्ण कर्मचारी क्षमतेने सुरू केली जाणार आहेत. लग्न समारंभ आणि अंतिम विधीसाठी आता 50 नागरिकांना सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. पहिल्यांदा ही क्षमता 21 इतकी होती.
यासोबतच कॉर्पोरेट कार्यालये देखील पूर्ण कर्मचारी क्षमतेने सुरू केली जाणार आहेत. मात्र, यावेळी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच सर्व कार्यालयांना नियमितपणे सॅनिटाईज करणे अनिवार्य असणार आहे. राज्यातील स्विमिंग पूल, स्पा अजूनही बंदच असणार आहेत. मात्र, हॉटेल्स आणि गोल्फ क्लब मधील बार 50 % क्षमतेसह सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे. तसेच राज्यात लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. असे असले तरी सरकारने पुन्हा एकदा 28 जूनच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने सातव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे.