-आगीमध्ये लाखोंचे नुकसान
वार्ताहर / हर्णे
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात राजवाडी येथील महेश मळेकर यांचे मरीन स्पेअर पार्ट, हार्डवेअर दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पूर्ण खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हर्णे पाजपंढरीमधील शेकडो ग्रामस्थांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. हर्णे बंदरातील महेश मळेकर यांच्या मंगलमूर्ती दुकानाला मध्यरात्री आग लागल्यानंतर पूर्ण भडकल्यानंतरच परिसरातील रहिवाशांच्या ते लक्षात आले. हर्णे-पाजपंढरी गावात याची माहिती पोचताच सर्वधर्मीय शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी समुद्रातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी धोका पत्करून दुकानाशेजारील झोपडय़ावर उभे राहून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी दापोली नगर पंचायतीचा बंबही पोहोचला. बंबाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या आगीत मळेकर यांचे दुकान पूर्ण खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान आगीची माहिती कळताच आसूदचे वैद्यकीय अधिकारी मारकड व आंजर्लेचे वैद्यकीय अधिकारी मोहिते यांनी 2 रुग्णवाहिका तैनात केल्या. आग पूर्ण आटोक्यात आल्यानंतर व कोणी जखमी नसल्याची खात्री झाल्यावर दोन्ही रुग्णवाहिका रवाना झाल्या. या दुकानाजवळूनच आगीची घटना कळल्यानंतर त्या भागातील वीजपुरवठा त्वरित बंद करण्यात आल्याने मदतकार्य सुलभ झाले. आपत्कालीनप्रसंगी हर्णे पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकजुटीने शर्थीचे प्रयत्न करतात. आग आटोक्यात आणण्यासाठी पहाटेपर्यंत ग्रामस्थ उपस्थित होते.