खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही
प्रतिनिधी / दापोली
सागरी महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून हर्णे बंदरदेखील लवकरच अत्याधुनिक स्वरूपात अस्तित्वात येईल, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दापोली पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत दिली.
उत्तर रत्नागिरी दौऱयावर आलेल्या खासदार तटकरे यांनी दापोली पंचायत समितीची सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला दापोली पंचायत समितीचे सभापती रऊफ हजवानी, माजी आमदार संजय कदम, बाबाजी जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर, माजी सभापती राजेश गुजर यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य व शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या सभेत खासदार तटकरे यांनी विविध खात्यांचा आढावा घेतला.
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना पंधरा दिवसांत मदत
यावेळी बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळात अद्याप भरपाई मिळाली नाही अशांना येत्या पंधरा दिवसांत ती मिळेल. महावितरण’कडून आलेल्या वाढीव बिलाबद्दल तांत्रिक सल्लागारांना प्रत्येक तालुक्यात जाऊन ग्राहकांच्या बिलातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
गुहागरात आज बीएसएनएल-जीओ अधिकाऱयांची बैठक
तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळानंतर बीएसएनएल व जीओ या कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. याकरिता मंगळवारी गुहागर विश्रामगृहात आयोजित बैठकीत सर्व त्रुटी दूर करून या पाच तालुक्यांना लवकरात लवकर बीएसएनएल व जीओचे नेटवर्क कसे मिळेल याकडे स्वतः लक्ष देणार आहोत. दापोली तालुक्यात जन्मलेल्या नररत्नांची उचित स्मारकेदेखील लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सीआरझेडबाबत गुरुवारी जनसुनावणी
दापोली तालुका विकास पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सीआरझेडमुळे याला होणारी बाधा दूर करण्याकरिता गुरुवारी जनसुनावणी बोलावली आहे. पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यावर दापोली राष्ट्रीय पातळीवर झळकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीयकृत बँकांकडून निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना मदत देण्यास विलंब होत असल्याबद्दल अशा बँकांची आपण तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
दापोली उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे करणार
नागरिकांनी संयम पाळला तर आपल्याला लवकर कोरोनापासून मुक्ती मिळेल. दापोली उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी लवकरच बोलणार आहोत. तेथे नव्याने पदनिर्मिती करून पदेदेखील लवकरच भरण्यात येतील असे तटकरे म्हणाले.
आमदार योगेश कदम या बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ते वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेल्याने उपस्थित राहू शकले नसावेत. मात्र ते मुंबईमध्ये नेहमी भेटतात व येथील विविध विकासकामांवर चर्चा होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र स्थानिक पातळीवरदेखील राबवायचे आहे. मात्र यासाठी थोडा अवधी लागेल.
एलईडी मासेमारीबाबत केंद्रसरकारने याबाबत कोणताही नवीन कायदा पारीत केलेला नाही. यावेळचे अर्थसंकल्पिय अधिवेशन काही मंत्री व सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने लवकर संपवण्यात आले. पुढील अधिवेशनात हा विषय आपण मार्गी लावू, असेही ते म्हणाले.
दापोलीतील कुणबी भवनाबाबत बोलताना ते म्हणाले, दापोली नगरपंचायतीच्या हद्दीतील जागा कुणबी भवनासाठी राखीव आहे. याबाबत आपण मुख्याधिकाऱयांशी बोललो असून नगरपंचायतीकडून नाहरकत दाखला लवकरच मिळेल व कुणबी भवन लवकर उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खोका प्रश्नाबाबत अधिकारी चुकीची भूमिका घेत असून त्यांच्याबाबत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
रऊफ हजवानींना पक्षादेश बंधनकारक
दापोली पंचायत समितीचे सभापती रऊफ हजवानी राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढवून पंचायत समिती सदस्य व त्यामुळे सभापतीपदी विराजमान झाले. त्यांना कायदेशीर बंधने व पक्षाचे काही नियम पाळणे गरजेचे आहे. खासदार म्हणून त्यांची बाजू नक्कीच ऐकून घेऊ. यानंतर पक्ष बैठकीत होणारा निर्णय होईल त्यांना बंधनकारक असेल. यानंतर पुन्हा एकदिलाने काम सुरू होईल, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
जमावबंदी आदेश भंगाबद्दल दिलगिरी रत्नागिरी जिह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी दापोली पंचायत समितीमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत तुडुंब गर्दी झाल्याने या नियमाचा भंग झाला आहे. ही गंभीर बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आढावा बैठक परवानगी घेऊनच बोलावण्यात आलेली आहे. आपण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहोत मात्र सभागृहात झालेल्या गर्दीत आपली काहीही चूक नाही. तरीदेखील याबाबत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली.