वार्ताहर/ मौजेदापोली
दापोली तालुक्यातील हर्णै गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अंगणात खेळत असलेल्या 2 वर्षांच्या बाळाला चावा घेतल्याचे समोर आले. रियांस चौलकर असे या बालकाचे नाव असून त्याच्यावर दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची तब्येत आता ठिक असल्याचे हर्णै आरोग्य उपकेंद्रातून चौकशी दरम्यान सांगण्यात आले.
हर्णै येथील बाजार मोहल्ला, बाजारपेठ तसेच बंदर या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. हर्णै बंदरामध्ये मासे स्वच्छ केले जातात. तेथे खाद्य मिळत असल्याने या मार्गावर भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक आहे. यातील एक भटका कुत्रा पिसाळलला असून त्याने घराच्या आवारात खेळत असलेल्या बालकाच्या तोंडाजवळ चावा घेतला. तर गावातील अजून 8 जणांना चावला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हर्णै ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला असून तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.