वार्ताहर /किणये
तारीहाळ येथील पावन क्षेत्र बडेकोळ मठाची श्रावणी यात्रा शनिवारी मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवाच्या गजरात रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत बेळगाव, गोवा व कोल्हापूर येथील भाविकांनी गर्दी केली होती.
शुक्रवारपासून यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी मास्तमर्डी व तारीहाळ येथून पालख्या बडेकोळ मठात आल्या. त्यानंतर नागेंद्र स्वामीजी यांनी पालख्यांचे विधिवत पूजन केले. रात्री मठात भजन, प्रवचन व जागर भजनाचे कार्यक्रम झाले.
शनिवारी सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पादुका पूजन करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱया भक्तांची विशेष सोय करण्यात आली होती. फार वर्षांपूर्वीपासून मठात असलेल्या रथाला हार व फुलांनी सजविण्यात आले. त्यानंतर रथाचे पूजन नागेंद्र स्वामी यांनी केले.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि हर हर महादेवाच्या गजरात मठ परिसरात रथोत्सव मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. दिवसभर भाविकांनी मठात दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.