उपाध्यक्षपदी उज्ज्वला कुंभार यांची निवड
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहराजवळील हलकर्णी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी अत्यंत चुरशीने होऊन त्यामध्ये अध्यक्षपदी परशराम महादेव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला भैरू कुंभार यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी परशराम पाटील यांच्याबरोबरच हरिषकुमार शिलवंत यांनी अर्ज भरला होता. उपाध्यक्ष पदासाठी उज्ज्वला भैरू कुंभार व महबुबी शेख यांनी अर्ज भरले होते. पण त्यापैकी कुणीही माघार न घेतल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी तेराही ग्राम पंचायत सदस्यांनी मतदान केले. त्यामध्ये विजयी उमेदवारांना प्रत्येकी 7 तसेच पराभूत उमेदवारांना प्रत्येकी सहा मते पडली. यामुळे सात मते पडलेले परशराम पाटील यांची अध्यक्ष तर उज्ज्वला कुंभार यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके वाजवून व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. या ग्रा. पं. चे अध्यक्षपद सामान्यासाठी तर उपाध्यपद सामान्य महिलेसाठी राखीव आले होते. यावेळी नूतन ग्रा. पं. सदस्य संभाजी पाटील, भरमाप्पा नाईक, रेणुका कुंभार, अश्पाक अत्तार, पार्वती शिंगाडे, महबुबी शेख, शोभा शिंगाडे, प्रवीण अगणोजी, जिजा अल्लोळकर, रवि मादार आदी उपस्थित होते.