प्रतिनिधी/ बेळगाव
शेतामध्ये केलेल्या फूल लागवडीत लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान सोसावे लागल्याने तसेच इतर कामांसाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने हलगा येथील एका शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.
मारुती भीमा बिळगुचे (वय 63) असे त्या दुर्दैवी शेतकऱयाचे नाव आहे. मारुती यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मारुती यांचे गावच्या बाहेर असलेल्या शेतवडीत घर आहे. सोमवारी सकाळी ते शेतामध्येच होते. घरामधील मंडळी रोजच्याप्रमाणे ते शेताकडे गेलेत म्हणून बिनधास्त होती. सकाळी 9.30 वाजता घरातील मंडळींनी नाष्टादेखील केला. मात्र मारुती हे आले नाहीत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गेले असता एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपविले होते.
या घटनेमुळे कुटुंबीयांना एकच धक्का बसला. कर्ज कसे फेडावे या विवंचनेतूनच त्यांनी ही आत्महत्या केली. ही घटना पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती बागेवाडी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नागराज अंबीगेर दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवून दिला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.