17 एप्रिल रोजी आयोजन : बैठकीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग : गावातून शोभायात्रा काढण्याचा मनोदय
वार्ताहर /नंदगड
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थी घडविणाऱया हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृतमहोत्सव 17 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून विविध कार्यक्रमांचे आयोजन व मराठमोळय़ा वातावरणात गावातून शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमृतमहोत्सवी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष सुभाष हट्टीकर होते. व्यासपीठावर श्रीकांत गुरव, ग्राम पंचायत सदस्या अश्विनी देसाई, विठ्ठल हट्टीकर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली. श्रीकांत गुरव यांनी 2003 मध्ये शाळेचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे हा कार्यक्रमदेखील यशस्वी करण्यासाठी विविध समित्या नेमून तो यशस्वी करावा, असे सांगितले. निवृत्त प्राचार्य पी. के. चापगावकर यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. मिलिंद देसाई यांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या आवाहन पत्रिकेचे वाचन केले. यावेळी ग्राम पंचायत माजी सदस्य पांडू फोंडेकर, अर्जुन देसाई, नारायण जोगन्नावर, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई, माजी मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी, उमेश देसाई आदींनी विविध सूचना केल्या. यावेळी शंकर अंग्रोळकर, महादेव जाधव, किरण पेडणेकर, माया कामती, अपर्णा जोगन्नावर, अनिता जोगन्नावर, वासुदेव तळवार यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त रंगरंगोटी, डागडुजीसह विविध कामे हाती घेतली असून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भव्य शोभायात्रा काढली जाणार असून जनजागृतीसाठी सर्वांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.