सामग्री आणणाऱया ट्रकांसाठी विदेशातून स्कॅनर यंत्र
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी सामग्री आणणाऱया ट्रकांना स्कॅन केले जणार आहे. याकरता विदेशातून विशेष स्कॅनर मागविला जाणार आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱया राम मंदिराशी संबंधित सामग्री देशाच्या विविध हिस्स्यांमधून ट्रकांच्या मदतीने आणले जात आहे. यात सिमेंटपासून मार्बल आणि अन्य सामग्री आहे. अशा स्थितीत सुरक्षेचा विचार करता सुरक्षा यंत्रणांनी अयोध्येत राम मंदिरानजीक फुल बॉडी ट्रक स्कॅनर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्कॅनरद्वारे पूर्ण ट्रकाला सामग्रीसह स्कॅन करता येणार आहे. याकरता ट्रकमधील सामग्री उतरविण्याची गरज नाही.
फुल बॉडी स्कॅनरद्वारे कुठल्याही ट्रकला सामग्रीसह 2 मिनिटांमध्ये स्कॅन करता येऊ शकते. राम मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच दिला आहे. अशा स्थितीत सामग्री वाहून आणणाऱया ट्रकांद्वारे दहशतवादी संघटना स्फोटके किंवा अन्य शस्त्रास्त्रs आणण्याचा कट रचू शकतात.
फुल बॉडी स्कॅनरची किंमत सुमारे 40-50 लाख रुपये असते. स्कॅनर खरेदी करण्यासाठी काही विदेशी कंपन्यांशी बोलणी सुरु आहे. अलिकडेच असाच फुल बॉडी स्कॅनर अटारीमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरील इंटिग्रेटेड चेकपोस्टवर बसविण्यात आला आहे. याद्वारे तस्करी किंवा अन्य कट रोखता येणार आहेत. फुल बॉडी स्कॅनर विदेशातून मागविणे आणि अयोध्येत तो बसविण्यास 6-7 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱया उत्तरप्रदेश पोलिसांकडे तो सोपविण्यात येणार आहे.