प्रतिनिधी / सांगली
सद्यस्थितीमध्ये सांगली बाजार समितीमध्ये नियमितपणे गहू, ज्वारी ,तांदूळ, खाद्यतेल व डाळींची आवक होत आहे. त्यामुळे मागील एक महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक घटकांची कमतरता भासलेली नाही. कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक खरेदीदारास बाजार समिती आवारात येण्यासाठी प्रतिबंध केला असून केवळ रिटेल दुकानदार त्यांच्या खरेदीसाठी येऊ शकतात. तसेच होलसेल व्यापाऱ्यांना वैयक्तिक खरेदीदारस विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारामध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
बाजार समितीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये हळद येण्यास सुरुवात होईल. सांगली बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचे व्यवहार होत असतात. हळदीचे उघड लिलाव केल्यास सामाजिक अंतर राखले जाऊ शकणार नाही म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती आवारामध्ये उघड पद्धतीने लिलाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे. या ठिकाणी होणारे हळदीचे लिलाव ऑनलाईन पद्धतीने कराण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. भारत सरकार द्वारे राबवली जाणारी ई- नाम योजने अंतर्गत सांगली बाजार समितीचा समावेश महाराष्ट्र शासनामार्फत केलेला आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी मालाला लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणे अपेक्षित आहे. सध्या कोरोणाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत हळदीचे उघड लिलाव पद्धती ऐवजी ऑनलाइन लिलाव करणे अत्यावश्यक आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हळदीचे उघड पद्धतीने लिलाव होणार नाहीत अशाही सूचना दिलेल्या आहे. दिनांक 28 एप्रिल पासून सांगली बाजार समितीमध्ये हळदीचे ऑनलाइन लिलाव सुरू होणार असून या घटकातील आडते व व्यापाऱ्यांनी सकारात्मकतेने ऑनलाइन लिलाव पद्धतीने सहभागी होऊन सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे. लॅाकडाउनच्या कालावधीतही 46 कोटी44लाखाची उलाढाल झाली आहे.