प्रतिनिधी /म्हापसा
आगामी निवडणुकीसाठी मगो व तृणमूल काँग्रेस पक्षाने युती केल्याचे जाहीर केल्याने हळदोणा मतदारसंघात युतीचे उमेदवार म्हणून महेश साटेलकर यांनी आपला दावा केला आहे. महेश साटेलकर हे मगोचे उमेदवार आहेत. यापूर्वीच मगोचे उमेदवार म्हणून सुदीन ढवळीकर यांनी साटेलकर यांचे नाव जाहीर केले होते. आता मगो तृणमूल पक्षाची युती झाल्याने हळदोणा मतदारसंघातून युतीची तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचे साटेलकर यांनी दै. तरुण भारतला बोलताना सांगितले.
अद्याप जागा वाटप करण्यात आली नाही. मात्र मगोनी युती करतेवेळी 12 जागावर आपला दावा केलेला आहे. त्यात हळदोणचाही समावेश आहे. श्री. साटेलकर यांनी आपल्या प्रचार कार्यास जोर दिला आहे. दुसऱया बाजूनी किरण कांदोळकर यांनीही आपला दावा हळदोणासाठी तृणमूलमधून केला आहे. त्यामुळे तिकीटवरून यामतदारसंघात युती वादाच्या भोवऱयात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.