दोडामार्ग – वार्ताहर-
आजच्या संगणक युगात संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. माहितीचे – प्रचंड स्रोत आपल्यासमोर उभे आहेत ते फक्त शोधता आले पाहिजेत. अलिकडे ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा येत नाही, याबाबत प्रचंड न्यूनगंड असतो. मात्र जगात वेगवेगळ्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाषेच्या मर्यादा ओलांडून संशोधक संशोधन करत आहेत. संशोधनासाठी कोणतीही भाषा कमी नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता नवनवीन क्षेत्रामध्ये संशोधन करावे. ‘संशोधनासाठी भाषा ही कधीच अडसर ठरत नाही.’ असे प्रतिपादन सेंट विन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वारगेट पुणे येथील ग्रंथपाल प्राध्यापक योगेश मते यांनी व्यक्त केले.
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालायामार्फत भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त “एन लीस्ट ई-संसाधनांच्या वापराबाबत ऑनलाईन जागरुकता” या विषयावर आयोजित केलेल्या समारोह प्रसंगी बोलत होते.
श्री. मते पुढे बोलताना म्हणाले की, ई. -संसाधनाचा वापर संशोधनासाठी कसा करावा? तसेच ई-ग्रंथालयाच्या विविध संकेतस्थळांच्या माहितीबरोबरच बदलत्या काळातील ई-संसाधनाचे महत्व त्यांनी विषद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. यु. दरेकर यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्राचार्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या शुभेच्छापर मनोगतात त्यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनचरित्र व कार्यावर प्रकाश टाकला. ग्रंथालय विभागाचे प्रमुख रामकिसन मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट व हेतु कथन केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी ऑनलाईन स्वरुपात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय विभागप्रमुख रामकिसन मोरे यांनी तर आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.