काविळीने मृत्यू झाल्याचा अंदाज : कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
कणकवली:
मुंबईहून आल्यानंतर ‘क्वारंटाईन’ असतानाच प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दीप्तेश शंकर गुरव (23, रा. हळवल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. दरम्यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दीप्तेशच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ‘स्वॅब’चा अहवालही प्राप्त झाला असून तो ‘निगेटिव्ह’ आहे. दीप्तेशचा मृत्यू काविळसदृश आजाराने झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीप्तेश हा 9 जूनला ठाणे येथून हळवल येथील गावी आला होता. त्याला गावातच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. पण, गावी येण्यापूर्वीच त्याला काविळ झाली होती, असे निदान मुंबईतील एका डॉक्टरने केले होते. पण, दीप्तेशने याबाबत उपचार घेतले नव्हते. मात्र, हळवल येथे ‘क्वारंटाईन’ झाल्यानंतर त्याने दोन दिवस गावठी औषध घेतले.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून त्याला उलटय़ा होऊ लागल्या. त्याला सोमवारी सकाळी 9.30 वा. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील तपासणीत दीप्तेश याच्या मेंदूत काविळ मुरल्याचे आढळून आले. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, दीप्तेश हा परजिल्हय़ातून आल्याने ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर त्याच्या ‘स्वॅब’चे नमुने घेण्यात आले. सोमवारी सायंकाळी या नमुन्याचा अहवालही प्राप्त झाला असून तो ‘कोरोना निगेटिव्ह’ आहे. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
सोमवारी सायंकाळी दीप्तेशचा मृतदेह हळवल येथील गावी आणण्यात आला. त्याच्या आकस्मिक मृत्यूने गुरव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीप्तेश बारावीपर्यंत शिकला होता. गेली दोन वर्षे तो मुंबईत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.