वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई इंधनाच्या अर्थात जेट फ्यूलच्या किंमती 2 टक्के इतक्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवास करणाऱयांचा प्रवास महागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून त्यातुलनेत विमान इंधनाच्या किंमतीही वाढत असताना दिसत आहेत. या वर्षी सातव्यांदा विमान इंधनाच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. विमान प्रवास करणाऱयांना हा मोठा झटका असणार आहे.
शुक्रवारी तेल कंपन्यांनी दरात 2 टक्के इतकी वाढ केली. या इंधनाची किंमत आता 1,12,924.83 रुपये प्रति किलोलीटर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली आहे. याआधी इंधनाची किंमत 1,10,066 रुपये इतकी प्रतिलीटर होती.
देशातील राष्ट्रीय राजधानी दिल्लीत इंधनाचे दर 2 टक्के वाढत 1,12,924.83 रुपयांवर पोहचले आहेत. 16 मार्चला एटीएफ (इंधन) च्या किंमती 18 टक्के इतक्या वाढल्या होत्या. त्यावेळी प्रति किलोलीटरमागे 17,137 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.