स्वदेशी निर्मिती – लष्कराला ड्रोन, नौदलाला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट पंतप्रधान प्रदान करणार
झाशी / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील झाशी येथे येणार आहेत. या दौऱयात ते अधिकृतपणे जगातील सर्वात हलके स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर हवाई दलाला सुपूर्द करतील. या हेलिकॉप्टरमध्ये स्वदेशी रचना आणि प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरबरोबरच लष्कराला ड्रोन आणि नौदलाला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटही प्रदान करणार आहेत.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे. या अंतर्गत, शुक्रवारी पंतप्रधान झाशी येथे तीन दिवसीय राष्ट्रीय संरक्षण समर्पण महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. बुधवारी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे (एचएएल) डिझाईन आणि विकसित केले गेले आहे. याच्या निर्मितीची योजना 2006 मध्ये स्पष्ट करण्यात आली होती. ते तांत्रिकदृष्टय़ा खूप प्रगत असल्याचा दावा एचएएलकडून करण्यात आला आहे. 1999 च्या कारगिल युद्धापासून अशा प्रकारच्या हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात होते.
गेल्या वषी लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षाच्या वेळी भारतीय हवाई दलाने दोन हलकी लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती. या हेलिकॉप्टरनी 2015 मध्ये झालेल्या चाचणीदरम्यान 25,000 फूट उंचीपर्यंतची मजल गाठली होती. सदर हेलिकॉप्टर कोणत्याही हवामानात स्थिर गतिशीलतेसह शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवू शकते.