मैत्रिणींनो, फक्त चेहर्याची काळजी घेऊन भागत नाही तर संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्वचेच्या देखभालीसाठी आपण मॉईश्चरायझर वापरतो. नैसर्गिक तेल टिकवून ठेवण्यासोबतच त्वचेच्या पोषणासाठीही मॉईश्चरायझर लागतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मॉईश्चरायझर मिळतात. साधारणपणे त्वचेचा पोत लक्षात घेऊन मॉईश्चरायझर निवडला जातो. मात्र एसपीएफ हा घटक असणारा मॉईश्चरायझर त्वचेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरतो. आपण एसपीएफयुक्त सन्सस्क्रीन वापरतो. पण त्याऐवजी हा घटक असणारा मॉईश्चरायझर वापरला तर अधिक योग्य ठरेल.
एसपीएफयुक्त मॉईश्चरायझरमुळे त्वचेला आवश्यक असणारा ओलावा तर मिळतोच शिवाय हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षणही होतं. एसपीएफयुक्त मॉईश्चरायझर त्वचेत छान मुरतो. यामुळे टॅनिंग, त्वचेचा रंग बदलणं अशा समस्या निर्माण होत नाहीत. त्वचेवरील सुरकुत्या, डाग अशा कारणांमुळे आपण लवकर म्हातारे दिसू लागतो. हातापायांवरील सुरकुत्याही पटकन लक्षात येतात. हे टाळण्यासाठी एसपीएफयुक्त मॉईश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा अधिक काळपर्यंत तजेलदार आणि तरुण राहते. त्वचेवरील चमक टिकवण्यासाठीही मॉईश्चरायझरचा वापर करायला हवा.
एसपीएफयुक्त मॉईश्चरायझर लावल्यामुळे वेळेची बचत होऊ शकते. या मॉईश्चरायझरमुळे तुम्हाला सन्सस्क्रीन लावावं लागणार नाहीत. त्यामुळे त्वचेची देखभाल करण्यासाठी फार वेळ नसेल तर एसपीएफयुक्त मॉईश्चरायझर वापरा.