प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांची नुकतीच मुंबई येथे धावती भेट झाली. जिल्हा परिषद समिती सभापती निवडीसह गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उभयतांमध्ये प्राथमिक बोलणी झाल्याचे वृत्त आहे. अधिवेशनादरम्यान दोन्ही नेते मुंबईत असताना ही भेट झाल्याचे सुत्रांकडून समजते. आमदार पाटील मुंबईतच असून मंत्री मुश्रीफ सोमवारी मुंबईला गेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा सविस्तर चर्चा हेणार आहे. मुश्रीफ यांनी सांगितल्यानुसार या चर्चेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी होणार का? याकडे गोकुळ वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भातही दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. गोकुळ, जिल्हा बँक जिल्हय़ाच्या शिखर संस्था आहेत. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करायची असेल तर गोकुळमध्येही तो फार्म्युला वापरुया, काही जागांची आदला बदल करु, वाढलेल्या तीन जागा विभागून घेवून गोकुळही बिनविरोध केल्यास जनमानसात चांगला संदेश जाईल यासाठी दोघे मिळून प्रयत्न करुया असे आवाहन पी. एन. पाटील यांनी मुश्रीफ यांना केल्याचे समजते. मुश्रीफ यांनी मात्र सवाध भूमिका घेतली. दोन दिवसानंतर पुन्हा कोल्हापूर बसुया असे मुश्रीफ यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषदेमध्ये एक सभापतीपदाचा पी. एन. पाटील गटाचा प्रस्ताव
जिल्हा परिषद समिती सभापती निवडी तोंडावर आल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरु आहे. कार्यकर्त्यांचा विरोध डावलून काँग्रेसला पाठिंबा दिल्याने या बदल्यात शिवसेनेने तीन समित्यावर दावा केला असून एक समिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. याबाबत वाटाघाटी सुरु असताना आता काँग्रेसमधील पी. एन. पाटील पाटील समर्थकांनीही एक समिती मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भातही मुश्रीफ यांच्याही चर्चा होण्याची शक्यता आहे.