भगवान निंबाळकरांवर पोलीस अधिक्षकांची कौतुकाची थाप
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला 1 कोटी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन फिर्यादींना परत देण्यात आला आहे. या आदर्शवत कामगिरी केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या टीमवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कौतुकाची थाप टाकली.
सातारा शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजयकुमार बन्सल म्हणाले, दि. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी सातारा येथील सदरबझार परिसरात वनराज शिवाजी कुमकर (रा. शनिवार पेठ, सातारा) यांची गाडी थांबवून त्यांच्या मानेला चाकू लावून त्यांच्याकडील मोबाइल दोन पेनड्राईव्ह चोरून नेले होते. महानंदा प्रदीप तांबोळी (रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि सीमा संजय कोकरे (रा. केसरकर पेठ, सातारा) या मैत्रीण असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. सीमा कोकरे या महिलेने तांबोळी यांच्या घरातील 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते.
दिलीप विठ्ठल भिसे (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांच्याकडून संजय श्रावण सूर्यवंशी (रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांनी वेळोवेळी सेंट्रींगच्या कामासाठी लागणाऱया लोखंडी प्लेटा भाडय़ाने घेऊन त्या परस्पर विकून 1 लाख 20 हजार रुपयांना गंडा घातला होता.
आकाश राजेंद्र यादव (रा गोडोली, ता. सातारा) यांच्या संभाजीनगर सातारा येथील असणाऱया ढाणे क्लासेस शेजारील प्रेंड्स बेकरीचे कुलूप तोडून आतील 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले होते.
शिर्के व सय्यद यांनी फिर्यादीचे ट्रक नोटरी करून पुढील हप्ते भरतो असे सांगून ते घेऊन गेले होते. मात्र नंतर त्यांची परस्पर विक्री करून 1 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केली होती. हे गुन्हे सुद्धा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते.
तानाजी दत्तात्रय सासणे (रा. साई वरद रेसिडेन्सी, संगमनगर, सातारा) यांनी पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेली होती. असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीस गेलेला 1 कोटी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या अधिकाऱयांवर कौतुकाची थाप टाकत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस हवालदार नंदा अनभुले, पोलीस शिपाई विकास शिंदे यांचे विशेष कौतुक केले.