मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन : लसीकरण जागृतीसाठी नवी कल्पना लसीकरण पूर्णत्वासाठी 31 ऑक्टोबर लक्ष्य
प्रतिनिधी /मडगाव
कोविड-19 लसीच्या पहिल्या डोससह संपूर्ण पात्र लोकसंख्येचा समावेश केल्यानंतर, गोवा सरकारने मंगळवारी उर्वरित सर्व लोकांसाठी दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरचे लक्ष्य निर्धारित केले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गणेश चतुर्थीच्या काळात प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात गोवा शिपयार्डने पुरस्कृत केलेल्या स्वयंचलित ऑक्सिजन निर्माण करणाऱया प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक तसेच गोवा शिपयार्डचे सीएमडीई श्री. बी. बी नागपाल, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डिसा उपस्थित होते.
लस घेतलीय का ? विचारपूस करा
कुणाशीही हस्तांदोलन करताना प्रत्येकाने कोविड-19ची लस घेतलीय का याची विचारपूस करावी, जेणे करून लसीकरणाची अधिक प्रभावीपणे जागृती होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी सर्व आरोग्य पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ तयार आहे. परंतु आम्ही विशेषतः गणेश चतुर्थी सणाचा विचार करून लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून तयार राहण्याची अपेक्षा करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
संसर्ग वाढण्याचे टाळणे आवश्यक
यावेळी पुढे बोलताना प्रमोद सावंत म्हणाले की, कोविडची दुसरी लाट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात येईल याचा कुणीच विचार केला नव्हता. आत्ता एखाद्या व्यक्तीला संशय असल्यास तिने ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी व त्याचा तपशील येईपर्यंत स्वतःला विलगीकरणात ठेवावे. इतरांमध्ये फिरू नये. ज्यामुळे संसर्ग होण्याचे टाळणे शक्य होईल.
लसीचा दुसरा डोसही वेळेवर घ्यावा
31 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण पात्र लोकांनी कोविड-19 दुहेरी लस घ्यावी. दुसऱया लसीचा डोस घेण्यासाठी लोकांना अगोदर सूचित करण्यात आले होते. पहिला डोस घेतलेल्या वीस टक्के लोकसंख्येने, त्यांच्या दोन्ही डोसमध्ये अंतर संपण्याची तारीख असूनही, दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांनी हा डोस घ्यावा आणि राज्य सरकारला लसीकरणाचे लक्ष गाठण्यास सहकार्य करावे.
चतुर्थीच्या काळात सतर्क राहा
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना कोविड-19 च्या तिसऱया लाटेविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेजारील महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील केरळमध्ये रुग्णांची वाढती संख्या नोंदवली जात आहे, जी गोव्यासाठी सतर्कतेचे कारण बनली आहे. राज्यात 11.50 लाख लोकांना कोविड-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
केंद्र सरकार गोव्याच्या पाठीशी खंभीरपणे उभे : नाईक
जगावर अनेक संकटे येतात व जातात. मात्र, त्याविरोधात जर संघटीतपणे लढा दिला तर ही संकटे दूर करणे शक्य असते हे आम्ही कोविड-19च्या महामारीतून दाखवून दिले आहे. गोव्यात डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सरकारी अधिकारी यांनी आपआपल्या परिने योगदान दिल्यानेच कोविड महामारी नियंत्रणात आली आहे. आता तिसऱया लाटेची शक्यता वर्तविली जाते, अशावेळी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे, असे उद्गार केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. गोव्याला केंद्र सरकारचा नेहमीच पाठिंबा लाभला असून भविष्यातही गरज पडल्यास केंद्र सरकार गोव्याच्या पाठिंशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला स्वयंचलित ऑक्सिजन निर्माण करणारा प्लांट सुपूर्द केल्याने गोवा शिपयार्डचे विशेष आभार मानले. आज सरकारने तिसऱया लाटेची सर्व तयारी केलेली असली तरी सर्वांनी आपल्या जबाबदारीने वागले पाहिजे. कोविडच्या काळात डॉक्टर, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचाऱयांनी उल्लेखनी कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.